डोळ्यांच्या शस्त्रक्रियांना वेटिंग; शेकडो ज्येष्ठांसमोर अंधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:11+5:302021-05-12T04:18:11+5:30
नांदेड : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या वर्षभरापासून रुग्णालये कोविडच्या उपचारात व्यस्त आहेत. त्यामुळे अनेक ...
नांदेड : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला असून, गेल्या वर्षभरापासून रुग्णालये कोविडच्या उपचारात व्यस्त आहेत. त्यामुळे अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर मध्यंतरी शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु आता दुसऱ्या लाटेत पुन्हा शस्त्रक्रियांना ब्रेक देण्यात आला आहे. आजघडीला शासकीय रुग्णालयात अनेक ज्येष्ठ नेत्र शस्त्रक्रियेसाठी वेटिंगवर आहेत; तर अत्यावश्यक असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया मात्र लगेच करण्यात येत आहेत.
कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था खडबडून जागी झाली आहे. सर्व यंत्रणेचे कोरोनावरच लक्ष केंद्रीत केले आहे. विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयातही अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. काही दिवसांनी करता येणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या ठिकाणी उपचारासाठी दाखल होताना कोरोनाची तपासणी करून घेण्यात येत आहेत. नेत्र विभागात ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण दर महिन्याला शस्त्रक्रियेसाठी येतात. परंतु आता शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे रुग्णांचा ओढाही कमी झाला आहे.
ग्रामीण भागातून आम्ही या ठिकाणी उपचारासाठी येतो. परंतु सध्या कोरोनामुळे इतर आजाराकडे कुणीच लक्ष देत नाही. मला मोतीबिंदू झाला असून डॉक्टरांनी तपासणीनंतर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. परंतु या ठिकाणी आल्यानंतर मला काही दिवसांनी परत येण्यास सांगण्यात आले.
- रमेश जाधव
माझ्या मुलाचा डोळा तिरका आहे. एका डोळ्याने त्याला चांगले दिसते. डॉक्टरांनी सध्या कोरोनाचा संसर्ग अधिक असल्यामुळे काही दिवसानंतर शस्त्रक्रिया केली, तरी काही बिघडत नाही, असे सांगितले. त्यामुळे कोरोना कमी झाल्यानंतर आम्ही परत रुग्णालयात येणार आहे.
- विश्वास गायकवाड
कोरोनामुळे इतर आजारांचे रुग्ण सध्या कमीच आहेत. अत्यावश्यक असलेल्या सर्व शस्त्रक्रिया या ठिकाणी करण्यात येत आहेत. तर काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
-डॉ. वाय. एच. चव्हाण