भोकर तालुक्यात तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:53 AM2019-02-10T00:53:28+5:302019-02-10T00:53:45+5:30
तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
भोकर : तालुक्याची तहान भागविण्याकरिता अस्तित्वात असलेले तलाव गाळात रुतल्यामुळे जलसंकटाच्या भयातून मुक्त होण्यासाठी तलावांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. दिवसेंदिवस सिंचन क्षेत्रात कमालीची घट होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
तालुक्याला लाभलेली भौगोलिक परिस्थिती, अधिकचा डोंगराळ भाग यामुळे कायम पाण्याच्या स्तोत्राचा अभाव असल्याने पूर्णत: निसर्गाच्या पर्जन्यमानावरच अवलंबून रहावे लागते. शेतकरी सुखी तर सर्व सुखी, असे मानण्यात येवून जगाचा पोशिंदा जगला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न होत असतात. येथील कोरडवाहू शेती पाण्याखाली यावी, शेतकरी सुखी व्हावा या दृष्टिकोनातून कै. शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने १९७२ मध्ये मराठवाड्यातील पहिला बंधारा रावणगाव येथे तयार करण्यात आला होता. त्यानंतर ८० च्या दशकापर्यंत तालुक्यात धानोरा, इळेगाव, लामकाणी, किनी, कांडली, भुरभुशी, आमठाणा आदी भागात तलाव झाले. तर तत्कालीन राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या प्रयत्नाने रेणापूर शिवारात सुधा प्रकल्प तयार झाला.
रावणगाव येथील ३०० गेटच्या बंधाऱ्यावर या भागातील शेती सिंचनाखाली येत होती. त्याकाळी लाकडी पाट्या टाकून आत माती भरून पाणी अडविल्या जात असे. त्यानंतर माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या प्रयत्नाने यावर लोखंडी गेट बसविण्यात आले. सद्य:स्थितीत या बंधा-यात पाणी अडविण्यात येत असल्याने ९९ विद्युत मोटारीद्वारे २०० हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे. सदरील कोल्हापुरी बंधा-यातून काही प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. यामुळे या बंधाºयाची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या बंधा-यावरून शालेय विद्यार्थी ये-जा करत असतात. सदरील कोल्हापुरी बंधाºयाची दुरूस्ती करण्यासाठी लगळूद ग्रामपंचायतीने तीनवेळा ठराव घेवून शासनाकडे पाठविला आहे. बंधारा दुरूस्त झाल्यास या भागातील अधिक शेती सिंचनाखाली येवू शकते, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
सुधा प्रकल्प गाळात, सिंचन क्षमतेची हानी
तालुक्यातील सर्वात मोठा सात दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमतेचा सुधा प्रकल्पसुद्धा गाळयुक्त झाल्याने यावरील सिंचनक्षमता कमी झाली आहे. रेणापूर शिवारात २० वर्षांपूर्वी सुधा प्रकल्पाची निर्मिती झाली तेव्हापासून अद्यापपर्यंत यातील गाळ काढण्यात आला नाही. दोन कालव्यांच्या आधारे सातशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित होते. परंतु सद्य:स्थितीत कालवे नादुरूस्त असल्याने विद्युत पंपाद्वारे शेती ओलिताखाली येत आहे. मागील वीस वर्षांपूर्वी सातशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत होते. आता या सिंचन क्षेत्रात घट झाली आहे. भोकर शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी प्रकल्पातील १.८० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवण्यात येते. यामुळे किमान पाचशे हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणे आवश्यक आहे. परंतु दिवसेंदिवस साचत चाललेल्या गाळामुळे आज या प्रकल्पावरून प्रत्यक्षात ३५८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येत आहे. तर या परिसरातील पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतात असलेल्या विहीर व बोअरवरून २३८ हेक्टर शेती सिंचनाखाली येत आहे. सद्य:स्थितीत या प्रकल्पात ३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. या उपलब्ध पाण्यावर पुढील चार महिन्यांचे नियोजन करावे लागणार आहे. प्रकल्पामधील गाळ काढला तर सिंचनक्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याने प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.