पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची सात महिन्यांपासून प्रतीक्षा; दिवाळीचा मुहूर्तही टळणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2021 06:53 PM2021-10-27T18:53:56+5:302021-10-27T18:56:07+5:30
फेब्रुवारी २०२१ मध्ये पाेलीस उपअधीक्षकांच्या २३३ जागांसाठी सेवाज्येष्ठ पाेलीस निरीक्षकांची नावे व माहिती मागण्यात आली हाेती.
- राजेश निस्ताने
नांदेड : राज्यातील पाेलीस निरीक्षकांना पदाेन्नती देऊन उपअधीक्षक बनविले जाणार आहे. परंतु या पदाेन्नतीचा अद्याप मुहूर्त निघालेला नाही. गेल्या सात महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या पाेलीस अधिकाऱ्यांना आता दिवाळीचाही मुहूर्त टळताे की काय, अशी हुरहुर लागली आहे.
फेब्रुवारी २०२१ मध्ये पाेलीस उपअधीक्षकांच्या २३३ जागांसाठी सेवाज्येष्ठ पाेलीस निरीक्षकांची नावे व माहिती मागण्यात आली हाेती. त्यासाठी ४६६ नावांची यादी जारी केली गेली. एप्रिल २०२१ मध्ये विभागीय पदाेन्नती समितीच्या बैठकीने पदाेन्नती द्यावयाच्या २३३ नावांवर माेहर उमटविली. तेव्हापासून या अधिकाऱ्यांना पदाेन्नतीची प्रत्यक्ष यादी जारी हाेण्याची प्रतीक्षा आहे. या अधिकाऱ्यांना महसुली पसंतीक्रमही मागण्यात आले. मात्र आता त्यावरूनही दीड महिना लाेटला आहे. परंतु प्रत्यक्षात बढतीची यादी जारी झाली नाही. २३३ अधिकाऱ्यांच्या नावाची ही यादी आता १८० वर आली आहे. गेल्या सात महिन्यांत यातील ५३ पाेलीस निरीक्षक हे बढतीची वाट पाहून पाहून अखेर सेवानिवृत्त झाले. पाेलीस महासंचालकांनी आता दिवाळीचा मुहूर्त साधून तरी या १८० निरीक्षकांना पदाेन्नती द्यावी, अशी अपेक्षा आहे.
३१ ऑक्टाेबरपर्यंत पदाेन्नतीची यादी न निघाल्यास आणखी ११ पाेलीस निरीक्षक पदाेन्नतीशिवाय सेवानिवृत्त हाेणार आहेत. किमान शेवटचे दाेन-चार दिवस तरी पाेलीस उपअधीक्षक हाेता यावे, अशी या अधिकाऱ्यांची भावना आहे. वास्तविक या पदाचे वेतन त्यांना सध्याच दिलेही जात आहे. दिवाळीचा मुहूर्त पदाेन्नतीसाठी टळणार तर नाही, अशी भीती अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. पदाेन्नतीच्या या फाईलीचा प्रवास संथ व्हावा यासाठी वरकमाईच्या जागांवर बसलेले काही वरिष्ठ पाेलीस निरीक्षक प्रयत्नरत आहेत. गेल्या सात महिन्यांपासून हाेणारा विलंब लक्षात घेता या निरीक्षकांना यश तर येत नसावे ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
महासंचालकांच्या घाेषणेनंतरही यादी रखडली
राज्याचे पाेलीस महासंचालक संजयकुमार पाण्डेय हे प्रत्येक रविवारी आठवडाभरातील कामकाजाचा लेखाजाेखा सादर करतात. त्यात त्यांनी लवकरच पाेलीस निरीक्षकांच्या बढतीची यादी जारी हाेईल असे स्पष्ट केले हाेते. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष यादी जारी न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.