तेलंगणातील दारु दुकानांवर वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:52 AM2019-03-31T00:52:58+5:302019-03-31T00:53:33+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी मतदान व २३ मे रोजी मतमोजणी होत आहे.
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या आदिलाबाद, निझामाबाद, निर्मल, कामारेड्डी या जिल्ह्यांत ११ एप्रिल रोजी मतदान व २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. या अनुषंगाने तेलंगणा राज्यातील ५ कि.मी. अंतरावरील सीमावर्ती भागात मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काढले आहेत. या काळात या दुकानांवर वॉच ठेवण्यात येणार आहे़
निवडणूक कार्यक्रमानुसार नांदेड मतदारसंघासाठी मतदान १८ एप्रिल रोजी तर मतमोजणी २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे जिल्हा हद्दीतील सर्व मतदान व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी सर्व सीएल-३, एफएल-२, एफएल-३ (परवाना कक्ष) एफएल / बीआर- २ व ताडी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजे १६ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते १७ एप्रिल रोजी संपूर्ण दिवस, मतदानाच्या दिवशी १८ एप्रिल रोजी संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे़ दरम्यान, ड्राय डे च्या काळात अवैधपणे होणारी दारुविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क व पोलीस दलाला आदेश देण्यात आले आहेत़