बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात गेले, ०.४ टीएमसी पाणी शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 20:00 IST2025-03-03T19:59:26+5:302025-03-03T20:00:24+5:30

बंधाऱ्यात एकूण ०.१० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यापैकी ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले.

Water from Babhali Dam flows into Telangana, 0.4 TMC water left | बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात गेले, ०.४ टीएमसी पाणी शिल्लक

बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात गेले, ०.४ टीएमसी पाणी शिल्लक

धर्माबाद (जि.नांदेड) : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याच्या पाच दरवाजांद्वारे १ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडण्यात आले. बंधाऱ्यात एकूण ०.१० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यापैकी ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडले. आता बंधाऱ्यात केवळ ०.४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकारामुळे हा बंधारा कोणाच्या फायद्याचा आहे, अशी चर्चा सुरु आहे.

धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधारा बांधकामावरून महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात वाद झाला. यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयाने २८ फेब्रुवारी २०१३ रोजी बाभळी बंधाऱ्याचे दरवाजे दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी खाली सोडावेत व नंतर १ जुलै रोजी वर उचलावेत व १ मार्च रोजी ०.६ टीएमसी पाणी सोडावे, असा निर्णय दिला. त्यानुसार आज १ मार्च रोजी त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत बाभळी बंधाऱ्याचे प्रथम दरवाजा सकाळी ९ वाजता उघडला. दरवाजे ३,४,५,६,७ अशा पाच दरवाजांद्वारे १ वाजेपर्यंत उघडून ०.६ टीएमसी पाणी तेलंगणात सोडून दिले व नंतर सर्वच दरवाजे बंद करण्यात आले.

बंधाऱ्यात एकूण २८.५२ दशलक्ष घनमीटर (०.१० टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध होता. १७ दशलक्ष घनमीटर (०.६ टीएमसी) पाणी सोडल्यानंतर आता बंधाऱ्यात ११.५२ दशलक्ष घनमीटर (०.४ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती नांदेड पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. यावेळी त्रिस्तरीय समितीतील केंद्रीय जल आयोगाचे कार्यकारी अभियंता एम.व्यंकटेश्वरलू, तेलंगणा राज्यातील श्रीराम सागरचे कार्यकारी अभियंता एम.चक्रपाणी, महाराष्ट्र पाटबंधारे विभाग, श्रीराम सागरचे अभियंता रवी कोत्ता, बाभळी बंधाऱ्याचे उपविभागीय अभियंता पी. जी. कदम, कनिष्ठ अभियंता सचिन देवकांबळे, कनिष्ठ अभियंता डी. एस. गव्हाणे, आर. बी. खिंडरे, सागर गायकवाड, सुशांत, रिक्की यांच्यासह महावितरण कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Water from Babhali Dam flows into Telangana, 0.4 TMC water left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.