विष्णूपुरीसह उर्ध्व पैनगंगा, निम्न मानारमधून सिंचनासाठी पाणी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:18 AM2021-01-25T04:18:44+5:302021-01-25T04:18:44+5:30

नांदेड - विष्णूपुरी प्रकल्पातील १०० टक्के जलसाठ्यासह अंतेश्वर बंधाऱ्यातील २१ दशलक्ष घनमीटर आणि दिग्रस बंधाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या २४ दशलक्ष ...

Water for irrigation will be available from upper Panganga, lower Manar along with Vishnupuri | विष्णूपुरीसह उर्ध्व पैनगंगा, निम्न मानारमधून सिंचनासाठी पाणी मिळणार

विष्णूपुरीसह उर्ध्व पैनगंगा, निम्न मानारमधून सिंचनासाठी पाणी मिळणार

Next

नांदेड - विष्णूपुरी प्रकल्पातील १०० टक्के जलसाठ्यासह अंतेश्वर बंधाऱ्यातील २१ दशलक्ष घनमीटर आणि दिग्रस बंधाऱ्यातून प्राप्त होणाऱ्या २४ दशलक्ष घनमीटर जलसाठ्यातून रब्बी हंगामासाठी तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत. त्यातील दोन पाणी पाळ्या पूर्ण झाल्या असून, ७ फेब्रुवारीला तिसरी पाणी पाळी सिंचनासाठी दिली जाणार आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पासह निम्न मानार प्रकल्पातूनही रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी पाणी पाळ्या सोडल्या जाणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शंकरराव चव्हाण विष्णूपुरी प्रकल्पात १०० टक्के (८०.७९ दलघमी) पाणी उपलब्ध आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले असून, त्यातून २१.० दशलक्ष घनमीटर व दिग्रस बंधाऱ्यातून २४.० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. याद्वारे एकूण १२५.९५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. यातून बाष्पीभवन १६.३२ दशलक्ष घनमीटर वजा करता १०९.६३ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी ३८.५५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१.०८ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, सुमारे १३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या दिल्या जाणार आहेत.

उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातूनही उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. आणखी एक पाणी पाळी २७ जानेवारी रोजी दिली जाईल. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी ९६४.१० दशलक्ष घनमीटर (१०० टक्के) पाणी उपलब्ध झाले आहे. यातून प्रकल्पातील गाळ व बाष्पीभवन १७६.३२ दशलक्ष घनमीटर वजा जाता ७८७.७८ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. पिण्यासाठी उमरखेड, अर्धापूर, कळमनुरी तसेच नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ७७.१५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७१०.६४ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्यातून ८६ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात ३ पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात ४ पाणी पाळ्यांचे नियोजन केले आहे. त्यातील २७ नोव्हेंबर २०२० (पूर्ण), ३१ डिसेंबरची पाणी पाळी पूर्ण झाली आहे. २७ जानेवारी २०२१, १ मार्च २०२१, २७ मार्च २०२१, २३ एप्रिल २०२१, १९ मे २०२१ रोजी पाणी सोडले जाईल.

निम्न मानार प्रकल्पात तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच १०० टक्के (१२३.४९ दलघमी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून प्रकल्पातील बाष्पीभवन व गाळ २४.८८ दशलक्ष घनमीटर वजा करता ९८.६१ दशलक्ष घनमीटर पाणी वापरासाठी उपलब्ध होणार आहे. नायगाव, कंधार या तालुक्यातील ग्रामीण भागासाठी ४.६१ दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ९४.०० दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्यातून सुमारे २३ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तन दिले जाणार आहे. २५ नोव्हेंबर २०२० (पूर्ण), ३० डिसेंबर, २४ जानेवारी रोजी पाणी पाळी देण्यात आली आहे. आता १ मार्च २०२१, १ एप्रिल २०२१, १ मे २०२१ या तारखांमध्ये केवळ आपत्कालीन परिस्थितीतच बदल होऊ शकतो.

Web Title: Water for irrigation will be available from upper Panganga, lower Manar along with Vishnupuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.