पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:13 PM2023-01-31T13:13:37+5:302023-01-31T13:14:05+5:30

भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते.

Water issue is intimate, will talk to CM KCR if given a chance: Ashok Chavan | पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण

पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, संधी मिळाली तर मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी बोलणार: अशोक चव्हाण

googlenewsNext

नांदेड : केवळ नांदेड जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाड्यासाठी पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा आहे. महाराष्ट्रातून वाहून गेलेले पाणी थेट समुद्रात जात आहे. लवादाच्या निर्णयानुसार पाणी सोडावेच लागते. पाणीप्रश्नी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रव्यवहार केला. मीदेखील पाठपुरावा केला. परंतु, मार्ग निघाला नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, त्यांना बोलण्याची संधी मिळाली तर मी निश्चित पाणी प्रश्नावर बोलणार, असे मत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्वेसर्वा तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर हे नांदेड येथे १ फेब्रुवारी रोजी येत आहेत. त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून अशोकराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित पत्रपरिषदेत पत्रकारांनी बीआरएसचे के. चंद्रशेखर राव यांच्याविषयी प्रश्न विचारले असता त्यांनी आपली भूमिका विशद केली. भारत राष्ट्र समितीची भूमिका भाजपविरोधी आहे, ते समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचे समजते. आम्हीदेखील त्यांचे स्वागत करतो. कोणत्याही राजकीय पक्ष अथवा नेत्याला विरोध नसतो, प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. त्याला विरोध असतो, असेही चव्हाण म्हणाले. बाभळी बंधाऱ्यातून पाणी सोडावे लागते, पुढे ते समुद्रात जाते. त्यामुळे त्याचा कुणालाच फायदा होत नाही. त्यामुळे पाणीप्रश्नावर आपण त्यांच्याशी संवाद साधू, अशी भूमिका चव्हाण यांनी व्यक्त केली.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीबाबत बोलताना त्यांनी अद्यापपर्यंत प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राष्ट्रवादी अथवा काँग्रेसची चर्चा झालेली नाही. याबाबत शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती झाली आहे. भविष्यात ठाकरे हे महाविकास आघाडीत त्यांना घेण्याबाबत चर्चा करतील आणि त्यानंतरच पुढील दिशा आणि भूमिका ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Water issue is intimate, will talk to CM KCR if given a chance: Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.