बिलोली तालुक्यात तीव्र पाणीटंचाई सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:41 AM2019-04-20T00:41:52+5:302019-04-20T00:45:10+5:30
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
बिलोली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे मानवासह पशुपक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे शेळ्या, मेंढ्या तसेच दूध उत्पादकांना फटका बसत आहे. गुरांसह बकऱ्यांच्या चा-याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एप्रिल हिटने नागरिक पुरते बेजार झाले आहेत. तापमानवाढीमुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
बिलोली तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक पशुपालकांचे संसार शेलीपालन, पशुपालनावर चालतात. शेलीपालन व्यवसाय फायदेशीर ठरत असताना वाढत्या तापमानामुळे उष्माघातात शेळ्या आजारी पडू लागल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात मुख्यालयी असणारे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याने उपचाराअभावी जनावरे दगावू लागली आहेत. अधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन पशुपालकांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
पाणीटंचाईमुळे इतर तालुक्यातीलही मेंढपाळांचे कळप चाºयाच्या शोधार्थ दाखल झाले आहेत. तालुक्यातील अनेक ठिकाणचे तलाव, विहिरी, कूपनलिका, नद्या कोरड्या पडल्या आहेत. परिणामी जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
पाण्यासाठी नागरिकांचीही पायपीट पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘एप्रिल हिट’ ने नागरिक पुरते बेजार झाल्याचे दिसून येत आहे. आतापासून मे महिन्यातील तापमानाची शक्यता नागरिक वर्तवित आहेत. त्यामुळे पुढे आणखी परिस्थिती बिघडणार, अशी शक्यता आहे.
अघोषित भारनियमन
उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी नागरिक घरोघरी गारवा मिळविण्यासाठी कुलर लावतात. मात्र, गरज असताना बत्ती गुल होत आहे. रात्रीही पहाटे वीज खंडित होते. अघोषित भारनियमनामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील हिंगणी येथील नागरिकांना पाणी असूनही मिळेनासे झाले आहे. येथील हनुमान मंदिरालगत असलेली पाण्याची मोटार एका महिन्यात तीन वेळा नादुरुस्त झाल्याने गत बारा दिवसांपर्वीपासून जनतेला पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ मात्र याकडे संबंधितांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे. आता लोकसभा निवडणुका संपल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.