किनवट तालुक्यात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:35+5:302021-05-20T04:18:35+5:30
गडगा परिसरात पाऊस गडगा - परिसरात वादळी वाऱ्यासह सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने फळबागेसह रबी पिकांचेही नुकसान ...
गडगा परिसरात पाऊस
गडगा - परिसरात वादळी वाऱ्यासह सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने फळबागेसह रबी पिकांचेही नुकसान केले. सध्या भुईमुग व हळद काढणीचे काम सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. कारला, टाकळी, रातोळी, आलूवडगाव, माहेगाव आदी गावात भुईमुग, हळद काढणीचे काम चालू आहे. अधूनमधून पाऊस होत असल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे.
रासायनिक खताची दरवाढ मागे घ्या
नायगाव - जून महिन्यात खरीप हंगाम सुरू होत असून बी-बियाणे खरेदीसाठी शेतकरी धावपळ करीत आहेत. केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. खतांचे दर कमी करावे अशी मागणी किसान युवा क्रांती संघटना नायगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर माणिक चव्हाण, सुनील लुंगारे, विठ्ठल बेळगे, अविनाश आनेराये आदींच्या सह्या आहेत.
लॉकडाऊनमुळे उपासमार
सारखणी - ग्रामीण भागातील किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर करून सकाळी ७ ते१२ या वेळेतच व्यवसाय करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही वेळ गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या वेळेत दुकाने उघडी असूनही व्यापार होत नसल्यामुळे किरकोळ व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करा
भोकर - महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून निवेदनाद्वारे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष निखील हंकारे, विजय पाटील मोरे, कुलदीप तोडे आदी उपस्थित होते.
वंचित आघाडीची बैठक
देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ मे रोजी शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयात वंचितच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी वंचित आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी फारुख अहमद यांनी कार्यकर्त्यांनी गावनिहाय कामाला लागावे असे आवाहन केले.
पीक विमा देण्याची मागणी
माहूर - जिल्ह्यातील माहूर व लोहा तालुका निरंक असल्याने विमा कंपनीच्या धोरणाविरूद्ध जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याची मागणी केली. खरीपातील पंजीकृत इफ्को टोकीयो या कंपनीकडून जवळपास जिल्ह्यात ६१३ कोटी रुपयांचा पीक विमा भरण्यात आला आहे.
फळ उत्पादक अडचणीत
शिवणी - कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी फळ उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना टरबुज व खरबुज स्वतला रस्त्यावर विकावे लागत आहे. मागील वर्षी ऐन उन्हाळ्यातच कोरोनाचे संकट आले. यंदाही कोरोनामुळे उन्हाळ्यातच शेतकऱ्यांना फटका बसला आहे. हजारो रुपये खर्च करून उत्पादन घेतलेल्या टरबुज व खरबुजाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
खताची दरवाढ मागे घ्या
कुंटूर - कोरोना काळात रासायनिक खतांची दरवाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले असून खताच्या एका बॅगमागे ७०० ते ७५० रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून दरवाढ कमी न झाल्यास रस्त्यावर उतरू असे निवेदन शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना दिले. यावेळी माणिक चव्हाण, सुनील लुंगारे, विठ्ठल बेळगे, नवनाथ जाधव, शहाजी कदम आदी उपस्थित होते.
वृक्षतोड थांबवा
फुलवळ - नांदेड ते फुलवळ मार्गे जळकोट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि लोहा ते फुलवळ मार्गे मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्गावर अनेक छोट्यामोठ्या झाडांच्या कत्तली करून मागील दीड वर्षापासून वृक्षतोड करण्यात आली आहे. या दोन्ही रस्त्याच्या बाजुने नवीन वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अद्यापही वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले नाही.
लसीकरणासाठी जनजागृतीची गरज
मांडवी - कोरोनापासून बचाव होण्यासाठी नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. मात्र आदिवासी डोंगराळ भागात अद्यापही लसीच्या संदर्भात नागरिकांमध्ये गैरसमज आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना आजारासंदर्भात जनजागृती करून लसीसंदर्भात माहिती देण्याची गरज आहे. काही दिवसापूर्वी बामणगुडा खेडी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पुजार यांनी लोकांच्या मनातील गैरसमज दूर केला होता.