नांदेड शहरावरील जलसंकट आणखी तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:23 AM2019-07-09T00:23:09+5:302019-07-09T00:24:18+5:30

लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे.

Water shortage in Nanded city is more intense | नांदेड शहरावरील जलसंकट आणखी तीव्र

नांदेड शहरावरील जलसंकट आणखी तीव्र

Next
ठळक मुद्देपाऊस लांबला : सिद्धेश्वरमधून सोडण्यात आलेले पाणी होणार दोन दिवसांत बंद

नांदेड : लांबलेला पाऊस, विष्णूपुरीतून झालेला अवैध पाणीउपसा आणि महापालिकेसह महावितरण, जिल्हा प्रशासनाने अवैध पाणी उपशाकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका नांदेडकरांना बसला असून, शहरावरील जलसंकट आणखी तीव्र झाले आहे. सिद्धेश्वर धरणाच्या मृत जलसाठ्यातून जवळपास १४ दलघमी पाणी नांदेडसाठी कॅनालद्वारे घेण्यात आले. यातील २.७० दलघमी पाणी आजघडीला उपलब्ध झाले आहे. सिद्धेश्वरमधून सोडण्यात येणारे पाणी दोन दिवसांत बंदच होणार आहे.
विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या जलसाठ्याकडे दुर्लक्ष केल्याने नांदेड शहरावर पहिल्यांदाच भीषण जलसंकट ओढवले आहे. शहरात आजघडीला ८ ते १० दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरुच आहे. विष्णूपुरी प्रकल्प कोरडा पडल्यानंतर सिद्धेश्वर धरणातून नांदेडसाठी १५ दलघमी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ९ जून रोजी कॅनालमार्गे पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. जवळपास महिनाभर हे पाणी सोडण्यात येत आहे. आतापर्यंत सिद्धेश्वर धरणातून १४ दलघमी पाणी सोडण्यात आले. १४ जून रोजी विष्णूपुरी प्रकल्पात पाणी पोहोचले. कॅनालमार्गे घेण्यात आलेल्या पाण्यापैकी गळती आणि बाष्पीभवन, पाणीचोरी पाहता विष्णूपुरी प्रकल्पात २.७० दलघमी पाणी उपलब्ध झाले आहे. अजूनही विष्णूपुरी प्रकल्प मृतसाठ्यातच आहे. सिद्धेश्वरमधून आलेल्या पाण्यातून विष्णूपुरीत प्रतिदिन १ ते अर्धा इंच पाणी वाढत गेले. त्यामुळे नांदेडकरांची तहान आजघडीला भागत आहे. पण सिद्धेश्वरमधील मृतजलसाठाही आता कमी झाल्याने सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेले पाणी दोन दिवसांत बंद होणार आहे.
जिल्ह्यात ८ जुलैपर्यंत केवळ ९ टक्के पाऊस झाला आहे. पावसाची प्रतीक्षा आतुरतेने केली जात आहे. उपलब्ध जलसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल याची खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती पाहता योग्य नियोजनाची गरज असल्याचे ते म्हणाले. माळी यांनी सोमवारी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील कोटीतीर्थ विद्युत पंपास भेट दिली. सिद्धेश्वर धरणातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे पाणी उपसा करुन जॅकवेल विहिरीत पाणी घेण्यासाठी लावण्यात आलेले १२ पैकी ९ पंप बंद करण्यात आले होते. हे पंप सुरु ठेवण्याची तयारी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, कार्यकारी अभियंता गिरीष कदम, उपअभियंता संघरत्न सोनसळे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, विष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध झालेला जलसाठ्याचे संरक्षण करण्याची गरज आहे. अवैध उपसा होऊ नये यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दहा पथकांची मंगळवारी आयुक्तांनी बैठक बोलाविली आहे. पथकप्रमुखांना पाण्याच्या संरक्षणाबाबत योग्य त्या सूचना दिल्या जाणार आहेत.
आता सातव्या दिवशी मिळणार पाणी
महापालिकेने पाणीटंचाईमुळे शहरात पाचव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. यातही अनेक तांत्रिक बाबीमुळे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. पाऊस लांबल्याने शहरवासियांची चिंता आणखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी आयुक्तांनी विष्णूपुरी प्रकल्पासह कोटीतीर्थ प्रकल्पाची पाहणी केली. शहरावरील जलसंकट पाहता आता शहराला पाचव्याऐवजी सातव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त माळी यांनी सांगितले. शहरवासियांनी जलसंकट पाहता उपलब्ध पाणी जपून आणि काळजीने वापरणे आवश्यक आहे. पाणी वाया घालू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Water shortage in Nanded city is more intense

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.