तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:53 AM2019-04-18T00:53:51+5:302019-04-18T00:54:48+5:30
मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे.
कळमनुरी : मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. पं.स.ने बनविलेला संभाव्य पाणीटंचाई आराखडा कागदावरच असल्याचे दिसत आहे.
तालुक्यातील ६० ते ७० गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासन लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीने ४ कोटी ७३ लाखांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून तो मंजूरही करून घेतला आहे. टँकरने पाणीपुरवठा व अधिग्रहण वगळता इतर कोणत्याही पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना होत नाहीत.
हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या पाण्याची मागणी वाढली असून त्यांचा धंदा मात्र सध्या तेजीत सुरू आहे. खरीप हंगामानेही यावर्षी दगा दिला. खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजना दुरूस्ती, विधन विहिरीची दुरूस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे आदी कामांना संभाव्य आराखड्यात मंजुरी मिळाली आहे. परंतु ही कामे अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे अनेक गावांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून तालुक्यातील नांदापूर येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ६८ लाखांचे नळ योजनेचे काम सुरू आहे. निवडणूकीच्या कामामुळे पाणीटंचाईकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईची दाहकता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
अधिग्रहण प्रस्ताव : मंजुरी मिळूनही धूळ खात
सध्या तालुक्यातील शिवणी खु., माळधावंडा, हातमाली, पाणबुडीवस्ती, पोत्रा, सिदगी, महालिंगीतांडा, कुपटी या आठ गावांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४० गावांत ५० अधिग्रहणाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. अजूनही १५ ते २० अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या हंगामात ७९ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जलस्त्रोत कोरडे ठाक पडले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
३५ नळ योजना बंद
तालुक्यातील ३५ नळ योजना किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत. तालुक्यात एकूण १ हजार ७५ हातपंप असून त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हातपंप किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत.