सिद्धेश्वर धरणाचे पाणी नांदेडकडे झेपावले, काहीअंशी दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 07:17 PM2019-06-11T19:17:22+5:302019-06-11T19:19:13+5:30
सिद्धेश्वरचे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत येण्याची अपेक्षा
नांदेड : एप्रिलच्या मध्यापासून तहानलेल्या नांदेडकरांसाठी अखेर सिद्धेश्वर धरणातून १० जून रोजी पाणी सोडण्यात आले असून हे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत विष्णूपुरी प्रकल्पात दाखल होणार आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यानंतर नांदेडकरांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटेल, असे आयुक्त लहुराज माळी यांनी सांगितले.
नांदेडकरांची तहान भागवणारा विष्णूपुरी प्रकल्प ३० मे पासूनच कोरडा झाल्याने पाण्यासाठी शहरवासियांची भटकंती सुरू आहे़ शहरातील अनेक भागात तब्बल १० ते १२ दिवसांपासून पाणी आले नाही़ त्याचवेळी शहरात अपुऱ्या टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत़
विष्णूपुरी कोरडा पडल्यानंतर येलदरी, दिग्रस हे प्रकल्पही कोरडेच होते. पाणी आणायचे कुठून? हा प्रश्न उद्भवला होता. अखेर पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत घेतलेल्या बैठकीत सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सिद्धेश्वरमधून पाणी घेण्याबाबत खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी झाली.
मागील आठ दिवसांपासून सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरी प्रकल्पात पाणी आणताना येणारे अडथळे दूर करण्याचे काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी ४ वाजता सिद्धेश्वर धरणातून विष्णूपुरीसाठी पाणी सोडण्यात आले. सिद्धेश्वरमधून १२३ क्युसेस विसर्ग सुरू आहे. प्रतितास १ किलोमीटर या वेगाने पाणी नांदेडकडे येत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत जवळपास ३६ कि.मी. अंतर पाणी आले होते. १२० कि.मी. अंतर लक्षात घेता हे पाणी बुधवारी सायंकाळपर्यंत विष्णूपुरीत पोहोचणार आहे. विष्णूपुरीपर्यंत येताना पाण्याचा किती अपव्यय होईल याकडेही लक्ष लागले आहे. सिद्धेश्वरमधून १५ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. दोन दलघमी पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा महापालिकेला आहे. या दोन दलघमी पाण्यातून नांदेडकरांना महिनाभर पाणी मिळणार असल्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले.
नांदेड शहराला विष्णूपुरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ चालू वर्षी ३० दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले होते़ त्यातच दिग्रस बंधाऱ्यातूनही नांदेडला पाणी घेण्यात आले होते़ मात्र पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने आणि विष्णूपुरी प्रकल्पातून अवैधरित्या होणारा पाणीउपसा रोखण्यास प्रशासनाला अपयश आल्याने मे मध्येच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ विष्णूपुरीतील मृत जलसाठ्यातून नांदेडकरांची तहान ३१ जुलैपर्यंत भागेल असे महापालिकेने म्हटले होते़ मात्र प्रत्यक्षात मृत जलसाठाही अत्यल्प असून कसेबसे पंप सुरू आहेत़ आता सिद्धेश्वर धरणातून पाणी आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असून हे पाणी रविवारी सोडण्यात आले. हे पाणी नांदेडमध्ये आल्यानंतर काहीअंशी टंचाई दूर होईल. मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत असल्या तरीही मान्सूनच्या मुख्य पावसानंतरच पाणीप्रश्न सुटणार आहे.
प्रत्येक प्रभागात एका टँकरने पाणीपुरवठा
शहरात सर्वच प्रभागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असताना केवळ १५ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. हे टँकर अपुरे ठरत होते. त्यामुळे टँकरच्या संख्येत वाढ करण्याची मागणी सोमवारी नगरसेवकांनी केली. ही मागणी मान्य करताना आयुक्त माळी यांनी प्रत्येक प्रभागात एक टँकर पाणीपुरवठ्यासाठी राहील, असे आदेश दिले. टँकरच्या संख्येत वाढ करण्यासह शहरातील हातपंप, विद्युतपंप दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून यासाठी एक स्वतंत्र पथक राहणार आहे. शहरात ७५ हातपंप सुरू आहेत तर ९८ विद्युत पंप आहेत. यातील किती पंप दुरुस्त आहेत याची माहिती घेतली जात आहे. जे पंप नादुरुस्त आहेत ते त्वरित दुरुस्त करुन पाणीपुरवठा केला जाईल.
नियंत्रण कक्षही स्थापन
शहरात अपुऱ्या पाण्यामुळे पाणीपुरवठा वेळापत्रक पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांना आपल्या भागात पाणी कधी येणार आहे? याची माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. या कक्षाचा क्रमांक ०२४६२-२३४४६१ असा राहणार आहे.
महापालिकेत तातडीची बैठक
शहरात दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. शहरातील पाणीप्रश्नाबाबत प्रशासनासह पदाधिकारी उदासीन असल्याचे म्हटले होते. हीच बाब लक्षात घेवून महापौर दीक्षा धबाले यांनी सोमवारी दुपारी ४ वाजता महापालिकेत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरात पाण्याची इतकी ओरड होत असताना प्रशासन उपाययोजना का करत नाही ? अशी विचारणा मुख्य पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर प्रशासनानेही ठोस उत्तर देताना उपाययोजना सुरू आहेत मात्र पाणी उपलब्ध नसल्याचे सांगितले.
आठ विद्युत पंपाने पाणीउपसा
प्रकल्पातील जिवंत जलसाठा संपल्यानंतर मृत जलसाठा उचलण्याचे काम महापालिका करीत आहे. काळेश्वर पंपगृहातील जॅकवेल विहिरीत पाणी टाकण्यासाठी आठ पंपांचा वापर केला जात आहे. या पंपगृहातून दक्षिण नांदेडला पाणीपुरवठा केला जात आहे.कोटीतीर्थ पंपगृहाच्या जॅकवेलमध्येही विद्युतपंपाने पाणी उपसा करण्याचे नियोजन होते. मात्र प्रत्यक्षात येथे पाईप टाकण्यात आले असले तरीही विद्युत पंप मात्र उपलब्ध नव्हते. जॅकवेलपर्यंत जेसीबी मशिनने खोदून पाणी नेण्यात आले आहे. मात्र, पंपगृहातील आठपैकी केवळ एकाच पंपाला पाणी उपलब्ध होत आहे.
गाळच गाळ : विष्णूपुरी प्रकल्पाच्या दरवाजाजवळ प्रकल्प कोरडा असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, येथे मोठ्या प्रमाणात गाळ असून हा गाळ काढण्याची संधी होती. मात्र गाळ काढण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.