विष्णूपुरीतून सिंचनासाठी पाणी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:23 AM2018-11-16T00:23:45+5:302018-11-16T00:24:52+5:30
विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे.
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाणीपाळी गुरुवारपासून सोडण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत हे पाणी सोडले जाणार असून दुसरी पाणीपाळी मात्र अनिश्चित असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे धोरण लक्षात घेता विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाणीपाळी सोडण्यात आली असली तरी दुसरी पाणी पाळी मात्र अनिश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरच पिकाचे नियोजन करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला गोदावरीच्या दोन्ही किणाऱ्यावरुन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा होत आहे. त्याचवेळी विष्णूपुरीत गेल्या महिनाभरात २३ दलघमी पाणी कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी १६ नोव्हेंबरपासून प्रशासनाची पथके रवाना होणार आहेत. अवैधरित्या पाणीउपसा करणारे विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. त्याचवेळी महावितरणकडून प्रकल्प क्षेत्रातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शहराला आता दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. विष्णूपुरीतील जलसाठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसल्याने महापालिकेसह जिल्हा प्रशासनही चिंतीत झाले आहे. विष्णूपुरीत पाणी घेण्यासाठी असलेले येलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन्ही पर्याय कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा, यासाठी नियोजन केले जात आहे.