पुन्हा दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:23+5:302021-07-20T04:14:23+5:30
जिल्ह्यात पावसाची सुरुवात चांगली झाली आहे. जूनमध्येच पहिल्यांदाच शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरला होता. असे असतानाही शहरवासीयांना ...
जिल्ह्यात पावसाची सुरुवात चांगली झाली आहे. जूनमध्येच पहिल्यांदाच शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरला होता. असे असतानाही शहरवासीयांना पाण्यासाठी चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागत आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर सामान्य नागरिक संतप्त आहे. त्याचवेळी सर्वसाधारण सभेतही नगरसेवकांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. महापालिकेकडे असलेल्या थकबाकीमुळे महावितरणनेही पाणी पुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला होता. त्याचा परिणामही पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकावर झाला. त्यातही १५ दिवस शहरवासीयांची तारांबळ उडाली. १ कोटी ८० लाख रुपये विद्युतदेयक भरल्यानंतर महावितरणने वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पुन्हा १४ व १५ जुलैरोजी शहराला नियोजित वेळापत्रकानुसार पाणी मिळाले नाही. १४ जुलै ते १९ जुलै या कालावधीत पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. विशेष म्हणजे गाळयुक्त पाण्यामुळे शहराचा पाणीपुरवठा पहिल्यांदाच विस्कळीत झाला होता. मात्र हा प्रश्न आता सुटला असून, २० जुलैपासून शहरातील सर्व भागांना नियोजित वेळेनुसार दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती देण्यात आली. शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाआड करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे महापौर मोहिनी येवनकर यांनी सांगितले आहे.