लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा; राज्याच्या इतिहासातला काळा दिवस - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 17:22 IST2018-04-19T17:22:09+5:302018-04-19T17:22:09+5:30
राज्यात जलयुक्त शिवार योजना आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची कामे याच गतीने सुरू राहिल्यास संपूर्ण राज्य दोन वर्षात टँकरमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा; राज्याच्या इतिहासातला काळा दिवस - नितीन गडकरी
नांदेड : राज्यात जलयुक्त शिवार योजना आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेची कामे याच गतीने सुरू राहिल्यास संपूर्ण राज्य दोन वर्षात टँकरमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला़ त्याचवेळी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा दिवस म्हणजे राज्याच्या इतिहासातला काळ दिवस असल्याचे ते म्हणाले़
लोहा येथे झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या भूमीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते़ राज्यात जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ बुलडाणा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण केला होता असे सांगत गडकरी म्हणाले, या कामातून १२ लाख टन गाळ तेथील नदीनाल्यातून बाहेर काढण्यात आला़ या गाळ उपसाने आता पाण्याची पातळी वाढणार आहे़ त्याचवेळी सिंचन क्षेत्रातही वाढ होईल़ परिणामी शेतकºयांचे उत्पन्न वाढणार आहे़ केंद्रीय जलसंपदा विभागामार्फत राज्यात १७० बंधारे बांधण्यात येणार आहेत़ या बंधाºयाचा उपयोग पूल म्हणूनही होणार आहे़ या पद्धतीचे नांदेड जिल्ह्यात तीन बंधारे असतील तर लातूरमध्येही अशी बंधारे उभारली जात आहेत़ आंध्र प्रदेशात पोलावरम धरण केंद्र सरकार बांधत आहे़ यासाठीही ६० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ राज्यातही सिंचनाची कामे करण्यासाठी केंद्राकडून निधीची कमतरता राहणार नसल्याचे ते म्हणाले़
आपल्याकडे लक्ष्मीदर्शन नाही
केंद्र शासनाच्या रस्ते, वाहतूक आणि जलसंपदा विभागामार्फत कोट्यवधींची कामे सुरू आहेत़ ही कामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार तसेच वेळेमध्ये पूर्ण व्हावीत याकडेच आपले लक्ष असते़ एकाही ठेकेदाराला मला भेटण्याची गरज नसल्याचे सांगताना गडकरी यांनी लक्ष्मीदर्शनाचा विषय आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट केले़ लक्ष्मीदर्शनाचा उल्लेख भाजपाचे रावसाहेब दानवे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात केला होता़ त्यांच्याच उपस्थितीत गडकरी यांनी लोह्यामध्ये लक्ष्मीदर्शनाचा विषय काढला, हेही विशेष.