रमजान महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:00 AM2019-04-30T00:00:56+5:302019-04-30T00:01:35+5:30
मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा.
नांदेड : मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यास ६ मेपासून सुरुवात होत आहे. हा पवित्र महिना ऐन उन्हाळ्यात आल्याने महापालिकेने शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा. तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी केली आहे.
एकीकडे शहरातील विशेषत: दक्षिण नांदेडातीलपाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु आहे. विष्णूपुरीत दिवसागणिक जलसाठा कमी होत आहे. त्यामुळे जूनपर्यंत पाणीपुरवठा कसा करायचा याबाबत चिंतन केले जात आहे.
माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी २९ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पत्र देत रमजान महिन्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. तसेच सर्व प्रभागांतील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील मशीद, मंदिर व इतर प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी असलेली दिवाबत्ती सुव्यवस्थित ठेवावी, अशी सूचना केली आहे. बंद असलेले पथदिवे बदलून तातडीने नवीन एलईडी बसवावेत जेणेकरुन रात्रीच्यावेळी प्रार्थनेसाठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही.
रमजान महिन्यात स्वच्छतेकडेही विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रार्थनास्थळ परिसरात दैनंदिन स्वच्छता प्राधान्याने करावी. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी महापौर सत्तार यांनी केलेल्या मागण्यांमधील पाणीपुरवठ्याची मागणी वगळता इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी मनपा प्रशासनाला अडचण येणार नाही. पण एक दिवसाआड पाणीपुरवठा कसा करायचा ? हा प्रश्न आहे. आजघडीला तीन दिवसांआड पाणी दिले जात आहे. विष्णूपुरीत पाणी घेण्यासाठी पर्यायी प्रकल्पही कोरडे पडले आहेत.
दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी प्रभारी आयुक्त अशोक काकडे यांनी मंगळवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. जायकवाडीतून पाणी घेणे शक्य नाही. तर लोअर दुधनाचा विचार केला असता या प्रकल्पातील साठाही मृतसाठ्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी शहरवासियांना द्यावे लागणार आहे.
- मुस्लिम बांधवासाठी रमजान महिना पवित्र असतो. शहरात आज तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. विष्णूपुरीतील पाणी कमी झाले असले तरी इसापूर प्रकल्पातून सांगवी बंधा-यात पाणी घेतले जात आहे. हे पाणी दक्षिण नांदेडलाही देता येणे शक्य आहे. प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने केल्यास हा विषय मार्गी लागू शकतो, अशी प्रतिक्रिया माजी महापौर सत्तार यांनी दिली.