नांदेड शहराला विष्णूपुरीसह आसना नदीतूनही पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:39 PM2018-05-30T16:39:50+5:302018-05-30T16:39:50+5:30
शहराला आता विष्णूपुरीसह आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनेतूनही पाणीपुरवठा केला जात आहे.
नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून घेण्यात आलेल्या २५ दलघमी पाण्यापैकी जवळपास १५ दलघमी पाणी विष्णुपुरीत उपलब्ध झाले. त्याचवेळी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातूनही १ दलघमी पाणी घेण्यात आले आहे. त्यामुळे शहराला आता विष्णूपुरीसह आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनेतूनही पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यातही शहरात नियोजित पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे.
विष्णूपुरी प्रकल्प तळाशी गेल्यानंतर प्रारंभी डिग्रस बंधाऱ्यातून २० दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यानंतर मार्चमध्ये सिद्धेश्वर प्रकल्पातूनही १० दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यानंतर उर्ध्वपैनगंगा प्रकल्पातील पाणी शहरासाठी घेण्यात आले. मे मध्ये पुन्हा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा २५ दलघमी पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून राहाटी बंधाऱ्यामार्गे घेण्यात आले. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता.
दरम्यान, रमजान महिनाही मेच्या मध्यानंतर सुरू झाला. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करण्याचा निर्णय महापौर शिला भवरे यांनी घेतला होता. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करुन दोन ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू होत्या. शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकाबाबत नागरिकांची मोठी ओरड होती. मात्र नूतन आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच तयार केले. या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले. मात्र काही वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक प्रभावीत होत असल्याचे ते म्हणाले.
दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे कोटतीर्थ परिसरातील वीज पुरवठा तब्बल ३२ तास बंद झाला होता. त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर निश्चितपणे परिणाम झाला. मात्र सध्या शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे फारसा परिणाम झाला नाही. आसना नदीत उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील १ दलघमी पाणी २१ मे पासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरासाठीची पर्यायी पाणीपुरवठा योजना २३ मे पासून सुरू झाली आहे. परिणामी शहराला विष्णूपुरीसह आसनेतूनही पाणीपुरवठा केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी वेळेत उपलब्ध होत असल्यानेही नागरिकही समाधानी होत आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे आभार !
शहरात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरुन मोठी ओरड सुरू होती. अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा आदी विषयावरुन पाणीपुरवठा विभागाच्या नावाने ओरड विविध भागातून सुरू होती. त्यात नगरसेवकही संतप्त झाले होते. अखेर आयुक्त माळी यांनी आपल्या पहिल्याच सभेत नगरसेवकांना शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच दिले. त्या वेळापत्रकाची अंमलबजावणीही सुरू झाली. या सर्व बाबीचा सकारात्मक परिणाम पुढे आला आहे. जुन्या नांदेडातील शक्तीनगर येथील नागरिकांनी मंगळवारी महापालिकेत येऊन पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त केले. हा अनुभव पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला.