पाण्याची घागर पाच, कडबा २० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:49 AM2019-03-25T00:49:48+5:302019-03-25T00:50:31+5:30
मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जांब बु.येथे जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यात नावारुपाला आलेला आहे ; पण मागील चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे व अति- पाणीटंचाईमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
जांब बु़ : मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जांब बु.येथे जनावरांचा आठवडी बाजार मराठवाड्यात नावारुपाला आलेला आहे ; पण मागील चार वर्षांपासून अत्यल्प पावसामुळे व अति- पाणीटंचाईमुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. आठवडी बाजारात पाणी ५ रुपये घागर तर कडबा १५ ते २० रुपयाला पेंढी मिळत आहे. चारा- पाण्याच्या धास्तीने शेतकरी आपले पशुधन बेभाव किमतीत विक्री करत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या मागील चार वर्षांपासून तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला तर जांब बु़ मंडळात यावर्षी फक्त ५३६ मिमी पर्जन्यमान झाले़ सध्या मार्चमध्येच सर्व नदी, नाले, तलाव, विहिरी कोरडेठाक झाले असून पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
सतत चार वर्षांपासून दुष्काळामुळे शेती पिकेसुद्धा आले नाहीत व शेतात जनावरांचा चारा झाला नाही़ यामुळे चारा- पाण्याच्या भयानक संकटात बाजार सापडला असून शेतकऱ्यांना जनावरांना पाणी घेण्यासाठी एका घागरीसाठी ५ रुपये तर कडबा पेंढीसाठी १५ ते २० रुपये मोजावे लागतात़
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत असून याकडे संबंधितांनी लक्ष देऊन सुविधा पुरविल्यास शेतकरी व व्यापाºयांची ससेहोलपट थांबेल़
जांब बु़ येथे आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून येतात मोठे व्यापारी
मराठवाड्यातील नामवंत जनावरांच्या बाजारात पैकी जांब बु.येथील जनावरांचा आठवडी बाजार फारच प्रसिद्ध आहे. जांब बु. हे गाव १५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येचे व १५ सदस्य ग्रामपंचायत असलेले जिल्ह्याच्या व तालुक्याच्या सीमावर्ती भागात वसलेले गाव. गावाच्या आजूबाजूला ३ किलोमीटर अंतरावर जळकोट तालुका (जि. लातूर) शिंदगी, वांजरवाडा ता.जळकोट दिग्रस, दापका राजा, होंडाळा, नागरजांब, पाखंडेवाडी, गाढवेवाडी, सावरगाव पी़, सांगवी बेनक, कामजळगा, वर्ताळा ही गावे अवतीभवती असून या ठिकाणी जनावरांच्या बाजारासाठी खरेदी-विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेश व कर्नाटक मधूनसुद्धा मोठे व्यापारी जनावरे खरेदी करण्यासाठी येतात़ एवढा मोठा बाजार असूनही याठिकाणी कुठल्याही चांगल्या भौतिक सुविधा नसल्याने व्यापारी व शेतकºयांची ससेहोलपट होत आहे.