सोमवारपासून दोन दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:07+5:302021-06-16T04:25:07+5:30
शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प सोमवारी तुडुंब भरला. या प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ...
शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी प्रकल्प सोमवारी तुडुंब भरला. या प्रकल्पाचा एक दरवाजा उघडून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पण दुसरीकडे शहराला तीन दिवसाआड पाणी असे विरोधाभासी चित्र आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराबाबत सामान्य नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता संघरत्न सोनसळे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीत शहराला नियमित पाणी देण्यात कोणत्या अडचणी आहेत, यावर चर्चा करण्यात आली. यंदा पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी घेता आले नाही. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे प्रामुख्याने सांगण्यात आले. आसना नदीवर शेतकऱ्यांसाठी पादचारी पूल बनवण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. यामुळे बंधाऱ्यात पाणी साठवता आले नाही. त्याचवेळी कोटीतीर्थ, काळेश्वर येथील पंपगृहातील विद्युतपंप पूर्ण क्षमतेने चालत नसल्याची बाबही पुढे आली. या सर्व बाबी पाहता शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा कसा करता येईल, याबाबत अतिरिक्त आयुक्त मनोहरे यांनी सूचना दिल्या. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला २१ जूनपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल. हळूहळू तो एक दिवसाआड करण्याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत.
चौकट------------
काबरानगर जलशुद्धीकरण केंद्रातून जुन्या नांदेडला होणारा पाणीपुरवठा असदवन जलशुद्धीकरण केंद्रावरून करण्याचे नियोजन केले जात आहे. बोंढार ट्रेचिंग राउंड येथील जलकुंभात असदवन येथून पाणी घेतले जाईल. त्याचवेळी आसना नदीवर असलेल्या पर्यायी पाणीपुरवठा योजनेचे पाणी आतापर्यंत चौफाळा, देगलूरनाका या भागातील जलकुंभाला घेता येत नव्हते, ते घेण्याची सुविधाही करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात पर्यायी पाणीपुरवठा योजनेचे पाणी जुन्या नांदेडलाही उपलब्ध होईल.
चौकट---
शहरात पावसाळ्यातही तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आसनेवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे पाणी न घेता आल्याने अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यात विद्युतपंपाचाही विषय आहे. हे सर्व विषय सोडविण्यात येत आहे. विद्युतपंप नवे खरेदी केले जातील. तसेच अंतर्गत जलवाहिन्यांबाबतही निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून शहराला दोन दिवसाआड पाणी दिले जाईल.
- डॉ. सुनील लहाने, आयुक्त, मनपा, नांदेड