नादुरुस्त कॅनॉलमुळे पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 07:51 PM2019-12-10T19:51:59+5:302019-12-10T19:55:12+5:30
इसापूरमधून १२ डिसेंबरला सोडणार पाणी
बी़व्ही़चव्हाण । युनूस नदाफ। सुनील चौरे
नांदेड : इसापूर कालव्यातून १२ डिसेंबरपासून नांदेड जिल्ह्यातील सात तालुक्यांना पाणी सोडण्यात येणार आहे़ यंदा इसापूरमधून तीन पाणी पाळ्या सोडण्यात येणार आहेत़ परंतु ठिकठिकाणी कालवे नादुरुस्त असल्यामुळे सोडलेले लाखो लिटर पाणी वाया जाण्याची दाट शक्यता आहे़ अनेक ठिकाणी तर कालव्याला मोठी भगदाडे पडली आहेत़
अर्धापूर तालुक्याला निमगाव येथील सी.आर.गेटद्वारे अर्धापूर शाखा कालव्यात येणाऱ्या लहान कालव्यात झाडेझुडपे आणि पाईपमधील दगड, माती काढणी करण्यात आली नाही़ गेल्या काही वर्षांपासून कॅनॉलची स्वच्छताच करण्यात आली नाही़ त्यामुळे कालव्यात झाडे वाढली आहेत. तसेच जागोजागी कालव्याला भेगा पडल्या आहेत़ दगडमातीने कालव्याची रुंदी आणि खोली कमी झाली आहे़
ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाकडून इसापूर धरणाचे पाणी अर्धापूर तालुक्यातील काही भागात शेतीसाठी सोडण्यात येते़ त्यामुळे या भागात बागायती शेती आहे़ अर्धापूरला याच पाण्यावर हळद, ऊस, हरभरा, गहूू , ज्वारी आदी पिके घेतली जातात़ प्रामुख्याने केळीला देशातच नव्हे, तर परदेशातही मागणी आहे़ मात्र गेल्या काही वर्षांपासून पावसाळा सरासरीपेक्षा कमी होत असल्याने या भागात पाण्याची तीव्र समस्या निर्माण झाली होती.
यंदा इसापूर धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने या भागाकरिता पाणीपाळ्या सोडण्याचे जाहीर केले़ त्यानुसार पहिली पाणीपाळी १२ डिसेंबर सोडण्यात येणार आहे़ आर. एम. २३ चोरंबा शिवारातून पार्डी शिवारात येणाऱ्या कॅनॉलमध्ये मोठंमोठी बाभळीची झाडे वाढली आहेत तसेच सिमेंटचे बांधकाम फुटून गेले आहे. नळीमध्ये कचरा, माती, दगड गोळा झाल्यामुळे पाणीपुरवठा खंडित होऊन लाखो लिटर पाणी वाया जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही़ चोरंबा शिवारातून येणाऱ्या कॅनॉल आर.एम.२३ हा नांदेड - नागपूर महामार्गामधून पार्डी शिवारात येतो. रस्त्याची लांबी ५० फुटांची आहे़ आर. एम. ३, ४ मध्येही झाडे वाढली आहेत. जागोजागी माती आणि दगड आहेत़ त्यामुळे पाणी त्याच ठिकाणी थांबून ते शेजारील शेतात घुसण्याची शक्यता आहे़ कॅनॉलला सिमेंटचे बांधकाम केलेले असून जागोजागी प्लास्टर फुटून त्यामध्ये झाडे, झुडपे वाढली़
उमरी तालुक्यातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत इसापूर सिंचन कालव्याच्या दुरुस्तीचे कसलेही काम झाले नसल्यामुळे कालव्यामध्ये गवत, झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे सिंचनासाठी येणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रवाह पुढे जातच नाही. हा साधा तांत्रिक दोष याकडेही संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. आता तर या कालव्यांचा सिंचनासाठी प्रत्यक्ष वापर होत असताना सिंचनासाठी पाणी सोडण्यापूर्वी कालव्यांची तात्पुरती दुरुस्तीसुद्धा केली जात नाही. कोट्यवधी रुपये खर्चून १२५ किलोमीटर अंतरावरून आणलेल्या या पाण्याचा असा जर अपव्यय होत असेल तर याची प्रशासनाने गंभीरपणे दखल घेणे आवश्यक बनले आहे. प्रत्यक्ष या भागात कालव्याचे काम होताना मातीकाम व्यवस्थित झालेले नाही. मातीचा भराव भरण्यात आला नाही. त्यामुळे दोष राहिले व बऱ्याच ठिकाणी कालव्यामध्ये नेहमीच पाणी साठा होऊन राहतो. यामुळे खालच्या भागातील शेतीमध्ये दलदल निर्माण होते. अनेकवेळा या भागात कालवा फुटून पाणी वाया गेल्याची घटना घडलेल्या आहेत. मात्र अद्यापपावेतो या ठिकाणची दुरुस्ती व तांत्रिक दोष दूर करण्याबाबत संबंधित विभागाकडून प्रयत्न झाले नाहीत
हदगाव तालुक्यात ९० कि.मी. अंतराचा उर्ध्व पैनगंगा नदीवर प्रकल्प आहे. परंतु बांधकाम झाल्यापासून आतापर्यंत मजबुतीकरणाचे मोठे काम न झाल्यामुळे या कालव्यातून ठिकठिकाणी गळती लागते. त्यामुळे शेवटपर्यंत पाणी पोहोेचण्यासाठी मोठा कालावधी लागतो.
इसापूर धरणाच्या पाण्याचा हदगाव, हिमायतनगर तालुक्यांतील ६८ गावांना लाभ मिळतो. परंतु कळमनुरी तालुक्यातील दाती या गावापासून सुरु झालेला कालवा कानेगाव, चिखली फुटानामार्गे करमोड-पिंपरखेड हदगाव तालुक्यातून सहस्त्रकुंड धबधब्यापर्यंत वाहतो. परंतु पिंपरखेड, रुई, अंबाळा, वायफना, आवती आदी ठिकाणी दरवर्षी हा कालवा फुटतो. पाणी सोडण्यापूर्वीच या कालव्याची दुरुस्ती आवश्यक असते परंतु कालवा फुटल्यानंतरच कालव्याच्या कामाला निधी मिळतो. त्यामुळे पाणी वाया जाणे व त्यानंतर पाणी पाळ्यासाठी विलंब होऊन शेतकऱ्यांचा हंगामही वाया जातो.
तामसा-आष्टीमार्गे किनवट या रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. उमरी-आष्टी या रस्त्यावर हा कालवा वाहतो. सध्या या रस्त्याचे काम सुरु आहे. परंतु कालव्याचे सिमेंट काम अद्याप पूर्ण झालेच नाही. अंबाळा, पिंपरखेड, करमोडी, शिबदरा, कोथळा आदी ठिकाणी कालव्यांना झाडांनी वेढले आहे. पाणी सोडण्यापूर्वी झाडांची तोड होणे गरजेचे आहे. झाडांच्या मुळ्यामुळे पुन्हा कालवा फुटतो. करमोडी मार्गावर या कालव्याला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे अपघाताची भीती असते.सोयीनुसार काही शेतकरी या कालव्यातील पाणी कालवा फोडून स्वत:च्या गावासाठी आरक्षित करतात़ याकडे अधिकारी दुर्लक्ष करतात. आष्टी गावात दरवर्षी कालवा फुटतो. परंतु कायमस्वरुपी त्याचे काम केल्या जात नाही. अनेक ठिकाणी सिमेंंटची कामे उखडली आहेत. त्यामुळे पाणी काळ्या जमिनीत मुरते. पाण्याचा वेगही या नादुरुस्त कालव्यामुळे कमी करावा लागतो. त्यामुळे वाटेगाव, सिरंजनी, टेंभी या गावांना उशिरा पाणी मिळते.
कालव्यांच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट
च्उमरी भागातील अब्दुल्लापूरवाडी शिवाराच्या खाली असलेल्या कालव्यांचे अस्तरीकरण झाले नाही. ज्या भागात कालव्याचे अस्तरीकरण झाले तेथे खालच्या भागातील अस्तरीकरण पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा साठा होऊन बाजूच्या शेतीमध्ये सतत पाणी झिरपत राहते. यामुळे पाणी तर वाया जाणारच त्याबरोबरच कालव्याच्या खालच्या भागातील शेतीमध्ये दलदल निर्माण होऊन पिकेही नष्ट होणार आहेत. विशेष म्हणजे, उमरी तालुक्यात प्रारंभीच्या काळात या सिंचन कालव्यांची कामे होताना अनेक तांत्रिक दोष राहिले. परिणामी तळेगाव शिवारातील बिरोबा मंदिर भागात काव्यामध्ये नेहमीच १० ते १५ फूट पाण्याचा साठा नेहमीच असतो. इसापूर उजवा कालव्यातून सुमारे सव्वाशे किलोमीटर अंतरावरून हे पाणी सिंचनासाठी येते. मुख्य कालवा व त्या अंतर्गत असणाऱ्या वितरिका या कोणत्याही कालव्यांचे दुरुस्तीचे काम यावर्षी झालेले नाही. गवत, झाडेझुडपे वाढलेली आहेत. वरच्या भागातून पाणी आल्यावर कचरा, काटेरी झुडपांच्या फांद्या अडकून पाणी एकाच ठिकाणी अडून राहते. त्यामुळे कालवे भरून फुटल्याच्या घटना या भागात अनेकदा घडल्या आहेत़