माहूरचा रामगड किल्ला नामशेषाच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:55 PM2017-11-17T23:55:24+5:302017-11-17T23:55:26+5:30
समुद्रसपाटीपासून २ हजार ६०० फूट उंचीवर इ़स़७५८ मध्ये बांधण्यात आलेला ऐतिहासिक रामगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़
नितेश बनसोडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : समुद्रसपाटीपासून २ हजार ६०० फूट उंचीवर इ़स़७५८ मध्ये बांधण्यात आलेला ऐतिहासिक रामगड किल्ला पुरातत्त्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ गड किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे शासन उदासीन असल्यामुळे पर्यटकांनी या किल्ल्याकडे पाठ फिरविली आहे़
श्रीक्षेत्र माहूर हे भौगोलिकदृष्ट्या १९:४५ उत्तर रेखांश आणि ७७़५३ रेखांश पठारावर असलेला प्राचीन ऐतिहासिक ठेवा आहे़ या रामगड किल्ल्याला दोन तट आहेत़ हा किल्ला मेल (९ कि़मी़) विस्तार असून डोंगरी किल्ला, गिरी दुर्ग, गौंड किल्ला असे संबोधल्या जाते़ पहिला तट राष्ट्रकुटांनी बांधला तर दुसरा तट रामदेवराव यादव या राजाने बांधला आहे़ विशेष बाब म्हणजे, राष्ट्रकुटांनी देवगिरी किल्ला बांधला व कंधार, माहूर येथील किल्ला हे देखील त्याच कालखंडामध्ये बांधण्यात आले असून बांधकाम शैलीत व वास्तुच्या बाबीवरून साम्य आढळते़
प्रवेशद्वाराच्या संरक्षणासाठी अर्धवर्तुळाकार भिंत बांधलेली आहे़ मुख्य द्वारापासून पुढे नागमोडी रस्त्याने दुसºया प्रवेशद्वारापर्यंत जाता येते़ मुख्य प्रवेशद्वार १३ फूट उंच आणि १० फूट रुंद आहे़ पहिल्या प्रवेशद्वारातून ७२५ फूट अंतरावर दुसरे प्रवेशद्वार आहे़ रामगिरी किल्ल्यातील इजळा जलाशय व दुसरा मातृतीर्थ जलाशय आहे़
चोहोबाजूंनी चिरेबंदी बांधकाम असून दोन-दोन कठडे आहेत़ हवामहलची उंची ५३ फूट व लांबी ५२ फूट आहे़ हत्ती दरवाजातून पुढे गेल्यास उजवीकडे पश्चिमेस चिनीमहल बांधलेला आहे़ या ठिकाणीसुद्धा सैनिक तैनात असायचे़ चिनी महलाच्या पश्चिमेस निशाण बुरुजाजवळ दोन मशिदी आहेत़ किल्ल्यामध्ये त्याकाळी जलव्यवस्थापनाची साधने म्हणजे बारव, तलाव, कटोरा बावडी, गौतम झरा आहेत़