पोलिसांच्या अत्याचारामुळे गुन्हेगार झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:39+5:302021-06-25T04:14:39+5:30
पंजाबमधील एका माध्यमाने ही मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा व्हिडिओ नांदेडमध्ये समाज माध्यमांवर फिरतो आहे. त्यात रिंदा म्हणतोय, २००८ ...
पंजाबमधील एका माध्यमाने ही मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा व्हिडिओ नांदेडमध्ये समाज माध्यमांवर फिरतो आहे. त्यात रिंदा म्हणतोय, २००८ मध्ये बीदर (कर्नाटक) पोलिसांनी नांदेड येथील काही युवकांवर अन्याय केला. त्यामुळे माझ्या मनात सत्यासाठी लढण्याची मानसिकता तयार झाली आणि मी तशी सुरुवात केली. त्यानंतर मी पंजाबमध्ये आलो. येथील राजकारणाचा बळी ठरलो आणि तुरुंगात गेलो. सात वर्षे तुरुंगात असताना तुरुंगात मादक पदार्थ पुरवठा करणाऱ्यांविरुद्ध लढा दिला. मला पोलिसांनी गुन्हेगार बनवले याचे उदाहरण सांगताना रिंदा म्हणाला, मी एक खून केला. मरणारा व्यक्ती कोण्या तरी मोठ्या व्यक्तीचा नातलग होता. मी माझी बाजू पोलिसांसमक्ष सांगून हजर झालो होतो; पण पोलिसांनी माझ्यासोबत अन्याय केला. तेव्हा एका महिला अधिकाऱ्यासमक्ष मला हजर केले होते. मात्र, त्या अधिकाऱ्याला माझ्या शरीरावरील जखमा पाहता आल्या नाहीत, असे त्याने मुलाखतीत सांगितले.
नांदेडमध्ये मी एक खून केला, हे त्याने आपल्या मुलाखतीत मान्य केले. माझ्या बंधूच्या खुनामधील आरोपी माझ्या भाऊ आणि वडिलांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आला होता, असाही उल्लेख त्याने केला. नांदेडमध्ये रिंदाचा बंधू सत्याचा खून झाला होता. त्या प्रकरणातील आरोपींपैकी फक्त एकाला शिक्षा झाली. इतरांची पुराव्याअभावी सुटका झाली आहे. रिंदाला तू अनेकांकडून खंडणी वसूल केल्याचा प्रश्न विचारला गेला तेव्हा अत्यंत बेधडकपणे रिंदा सांगत होता, मी दोन नंबरच्या लोकांकडून खंडणी घेतल्या आहेत. सोबतच रिंदाने सांगितलेल्या माहितीनुसार नांदेडमध्ये काही पोलीसच माझ्या नावाने खंडणी वसूल करत होते. त्यातील एक पोलीस निरीक्षक मोक्काअंतर्गत सध्या तुरुंगात आहे. मला पोलिसांवर विश्वास नाही. मी घेतलेल्या अनुभवाप्रमाणे एका पोलीस अधिकाऱ्यासमक्ष मी सर्व हकीकत सांगितली. आपला गुन्हा कबूल करून हजर झालो होतो; पण नंतर तो पोलीस अधिकारी बदलला आणि माझ्यावर अन्याय झाला. असा खळबळजनक दावा रिंदाने केला आहे. रिंदा याच्या मुलाखतीने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये आजही रिंदाची दहशत कायम आहे.
कोट.........
आपण व्हिडिओ पाहिलेला नाही. मात्र, तो पाहून त्याची सत्यता तपासली जाईल. नंतरच नेमके काही सांगता येईल.
-प्रमोदकुमार शेवाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, नांदेड.