नांदेड जिल्ह्याला हवामान खात्याचा इशारा; येत्या २४ तासात होणार वादळी वाऱ्यासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 04:23 PM2018-05-16T16:23:09+5:302018-05-16T16:23:09+5:30
मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्याला आगामी २४ तासात वादळी-वारे, पाऊस, वीजा कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
नांदेड : मराठवाड्यातील काही ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्याला आगामी २४ तासात वादळी-वारे, पाऊस, वीजा कोसळण्याच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास शहरात १० ते १५ मिनिट जोरदार गारांचा पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसामुळे काही वेळ धांदल उडाली. सकाळपासूनच तापमानात उकाडा होता. दुपारी झालेल्या पावसानंतर पुन्हा उकाड्यात वाढ झाली. त्यातच शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आगामी २४ तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तसेच नांदेड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वारे सुटतील, असा इशारा दिला आहे. नांदेड जिल्ह्यात सावधानतेचा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या या इशा-याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.