खड्डे करणार विघ्नहर्त्याचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:33+5:302021-09-09T04:23:33+5:30
नांदेड : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. परंतु, अद्यापही शहरातील खड्ड्यांचे विघ्न दूर झालेले नाही. गेल्या दोन दिवसातील ...
नांदेड : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. परंतु, अद्यापही शहरातील खड्ड्यांचे विघ्न दूर झालेले नाही. गेल्या दोन दिवसातील पावसाने तर महापालिकेने बुजवलेल्या सर्व खड्ड्यांचे पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे गणरायांचे स्वागत खड्डेमय रस्त्यांवरुनच करावे लागणार आहे. शहरात महापालिकेने खड्डे दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करुन आणला. परंतु, प्रत्यक्षात खड्डे दुरुस्तीची कामे सुरु झाली नाहीत. एकच रस्ता अनेकवेळा करुन त्याची बिले उचलण्याचा पराक्रमही नांदेड महापालिकेच्याच नावावर आहे. मध्यंतरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यानिमित्ताने काही रस्त्यांचे भाग्य उजळले होते. थातूर-मातूर का होईना त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, आता पावसाने सर्व धुवून नेले आहे. गणेशोत्सव आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर तातडीने शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे दुरुस्त करण्याची गरज होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे आता खड्डेमय रस्त्यांवरुनच गणरायांचे आगमन होणार आहे.