लाडक्या बहिणीला १५०० रुपये अन् सावित्रीच्या लेकीला ३२ वर्षांपासून दिवसाला १ रुपयाच भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:19 PM2024-09-14T12:19:52+5:302024-09-14T12:25:19+5:30
रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात.
कंधार ( नांदेड) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत अन् शाळेतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमातीतील शासनाकडून प्रतिविद्यार्थिनी दिवसाला १ रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. गत ३२ वर्षांपासून सावित्रीच्या लेकींसाठीच्या या प्रोत्साहनपर भत्त्यात सरकारने एका पैशाचीही वाढ केली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरू केलेल्या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधींकडून होत नाही. रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात. त्यामुळे या योजेनच्या आढावा घेऊन भत्ता वाढवावा, अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
१९९२ ला तत्कालीन सरकारने दुर्बल घटकांतील पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या प्रतिविद्यार्थिनी दिवसाला १ रुपया प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ही योजना सुरू केली. मात्र मागील ३२ वर्षांपासून भत्ता वाढलेला नाही. वाढती महागाई पाहता मिळणारा भत्ता अतिशय तुटपुंजा आहे. मिळणाऱ्या भत्याच्या तुलनेत शैक्षणिक साहित्याच्या किंमतीत कित्येक पटीने वाढल्या आहेत. पेनमधील कांडीची किंमतही एक रुपयापेक्षा जास्त आहे. तरीही आजपर्यंत कोणत्याच सरकारने विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला १५०० रुपये दिले जात आहेत. मात्र सावित्रींच्या लेकींना केवळ १ रुपयाच उपस्थिती भत्ता आजतागायत मिळत आहे. या अल्पभत्त्याचा मुलींना लाभ होत नाही. त्यातच आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झाली नसताना हा रुपया देखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सरकारने थट्टा थांबवावी. त्यामुळे ही योजना एक तर बंद करावी नाही तर त्यामध्ये वाढ करावी, अशी मागण येथील पालक वर्गातून केली जात आहे.
शैक्षणिक वर्षासाठी दर दिवसाला १ रुपया त्यात वर्षभरातील रविवार वगळून २०० ते २२० रूपयापर्यंत उपस्थिती भत्ता दिला जातो. योजनेला ३२ वर्षे उलटली आहेत. मात्र, एकीकडे वेतन आयोग लागू होत असताना दुसरीकडे मात्र, विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात छदामही वाढ करण्यात आलेली नाही. वेतन आयोग लागू व्हावा, पेन्शन योजना सुरू व्हावी, यासाठी आवाज उठविणाऱ्या शिक्षक संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी गरीब विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्त्यात वाढ व्हावी, यासाठी आवाज उठविण्याची गरज आहे. अशी मागणी पालकांमधून होत आहे. लाडक्या बहिणींना महिन्याला घरबसल्या १५०० रुपये सुरु झाले आहेत. दारिद्रय रेषेखालील गरिबांच्या मुलींची महिन्याला २२ रुपये देऊन थट्टा केली जात आहे. वाढती महागाई लक्षात घेता यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. जशी लाडकी बहीण आहेत, तशी लाडकी मुलगी होऊ शकत नाही का? असा सवाल पालक वर्गातून केला जात आहे.
शासनाने दुर्लक्ष केले
यासंदर्भात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने राज्य शाखेच्या वतीने अनेकदा शासनाला निवेदन देऊन प्रत्येक विद्यार्थीनीना (आर्थिक दुर्बल घटकातील)महागाईच्या दृष्टीने १ रुपया ऐवजी १० रुपये भत्ता करण्यात यावे अशी मागणी केली. मात्र, याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.
- जी. एस. मंगनाळे, राज्य कोषाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना