औषध तुटवड्याचे काय सांगता? नांदेड प्रकरणी कोर्टाचे फटकारे, हायकोर्टाने सुमोटो घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 05:13 AM2023-10-05T05:13:05+5:302023-10-05T05:13:21+5:30
अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
मुंबई : नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांत रुग्णांच्या झालेल्या मृत्यूची उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत बुधवारी स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली. या मृत्यूंसाठी डॉक्टर, औषधांचा तुटवडा वा खाटांची कमतरता अशी कारणे दिली जात असतील तर ती मान्य नाहीत, अशा शब्दांत फटकारत न्यायालयाने राज्य सरकारकडून तपशिलात माहिती मागितली आहे. उद्या शुक्रवारी पुढील सुनावणी होईल.
मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने महाअधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना आरोग्यासंदर्भातील सुविधांसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद आहे, याची माहिती देण्याचे निर्देश दिले.
एकाच दिवशी मायलेकीचा मृत्यू
नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरवर बुधवारी रात्री सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
nकामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात ॲडमिट असताना बाहेरुन ४० हजाराहून अधिकची औषध खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले. रक्त व इतर तपासण्यासाठीही पैसेही खर्च करावे लागले. त्यात अधिष्ठाता डाॅ. एस.आर. वाकोडे आणि बालरोग विभागातील डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक उपचाराकडे दुर्लक्ष केले.
खासदारांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
अधिष्ठाता डॉ. वाकोडे यांच्या तक्रारीवरून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर आजच ॲट्रॉसिटी व शासकीय कामात हस्तक्षेप केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, हे विशेष. खासदार पाटील यांनी अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावले होते. यामुळे समाजात अवहेलना झाल्याचे म्हणत डॉ. वाकोडे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
मृत्यूंची संख्या ४१
बुधवारी नांदेड रुग्णालयातील आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्युसंख्या आता ४१ वर पोहोचली आहे. गंभीर बाब म्हणजे त्यात २२ बालकांचा समावेश आहे, अजूनही २५ हून अधिक बालके अत्यवस्थ आहेत.