‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’; विष्णुपुरीच्या पाण्यावरून खासदार-आमदारांत जुंपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:55 PM2020-08-19T15:55:18+5:302020-08-19T16:00:49+5:30
गोदावरीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याने परिसरातील इतर तलाव भरून घेण्याच्या मुद्यावरून राजकारण तापले आहे़
नांदेड : यंदा समाधानकारक झालेल्या पावसाने विष्णुपुरी प्रकल्पातून जवळपास आठ वेळेस पाणी गोदावरीत सोडण्यात आले़ त्यामुळे शेतकरीही आनंदात आहेत; परंतु गोदावरीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याने परिसरातील इतर तलाव भरून घेण्याच्या मुद्यावरून मात्र, राजकारण तापले आहे़ खा़ हेमंत पाटील यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या दक्षिण मतदारसंघातील या प्रकल्पाबाबत केलेल्या मागणीवर मात्र, आ़ मोहन हंबर्डे यांनी ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ अशी तिखट प्रतिक्रिया दिली़ त्यामुळे समाधानकारक पावसामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला असला तरी, आमदार व खासदाराच्या वादात या विषयावरून ठिणगी पडली आहे़
दरवर्षी विष्णुपुरी प्रकल्प भरल्यानंतर गोदावरीत त्याचा विसर्ग करण्यात येतो़ शेकडो दलघमी पाणी गोदावरीत वाहून जाते़ हे पाणी पुढे सोडण्याची घाई न करता डेरला, सोनखेड तसेच आसपासचे दहा तलाव भरून घ्यावेत, मगच विष्णुपुरी प्रकल्पातून पाणी सोडण्यात यावे़ अशी सूचना खा़ हेमंत पाटील यांनी केली होती़ त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे ते म्हणाले होते़ नांदेड दक्षिण हा हेमंत पाटील यांचा पूर्वीचा मतदारसंघ आहे; परंतु सध्या ते हिंगोलीचे खासदार आहेत़
त्यांनी नांदेड दक्षिण मतदारांघाबाबत केलेली मागणी आ़ मोहन हंबर्डे यांना जिव्हारी लागली़ लगेच त्यांनी खा़ पाटील यांच्यावर टीकेचा बाण सोडला़ विष्णुपुरीच्या पाण्याने परिसरातील तलाव भरून घेण्याबाबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि जिल्हाधिकारी विपीन ईटणकर यांच्याकडे २७ जुलै रोजीच मागणी केली असल्याचे हंबर्डे म्हणाले़ विष्णुपुरीचे विद्युत पंप दुरुस्त करण्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना सूचनाही दिल्या आहेत़ विष्णुपुरीचे पाणी तलावापर्यंत नेण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे़ या बातमीची चाहूल लागल्यामुळेच श्रेय घेण्यासाठी खा़पाटील यांनी ही उठाठेव केल्याचे हंबर्डे म्हणाले़