काय केले जाते ‘हॅप्पी व्हिलेज’मध्ये?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:57 AM2018-12-19T00:57:53+5:302018-12-19T00:58:38+5:30
६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे.
नांदेड : दर रविवारी डॉ. संग्राम जोंधळे सुमारे शंभरवर प्रशिक्षित साधकांसह कावलगाव येथे जातात. प्रारंभी गावातील सार्वजनिक सभागृहात सर्व साधकांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी १० मिनिटे ध्यानधारणा करून नियोजन करतात. त्यानंतर ६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे. याबरोबरच १० ते १९ या वयोगटातील जयकिसान शाळेतील दीड हजार आणि कावलगावच्या जिल्हा परिषद शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांचे शिबीर घेण्यात आले. आता गावातील प्रत्येक कुटुंब स्वत:हून ध्यानधारणा करीत आहे.
परिणाम काय?
उपक्रमाच्या दीड महिन्यातच ध्यानधारणेमुळे आपलेपणाची भावना वाढल्याचे ग्रामस्थ सांगतात. अनेक वर्षांच्या व्यसनालाही काहींनी मूठमाती दिली आहे. गावातील चौघांचे तंबाखूचे, तर तिघांचे दारूचे व्यसन सुटण्यास मदत मिळाली आहे. ध्यानधारणेमुळे पूर्वीच्या तुलनेत आनंद, उत्साह अधिक वाढला असून, आमची सुखाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
व्यसनाच्या पदार्थामुळे मनामध्ये संवेदना निर्माण होऊन त्याची आसक्ती होते आणि ती संवेदना वारंवार हवी वाटते. विपश्यनेमध्ये संवेदनेवर तटस्थपणे बघण्याचा अभ्यास केला जातो. ध्यानामुळे संवेदनेचा अनित्य स्वभाव कळतो आणि त्यानंतर त्या प्रतीची आसक्तीही कमी होते. -डॉ. संग्राम जोंधळे, प्रकल्पप्रमुख, हॅप्पी व्हिलेज
दर रविवारी घरोघरी जाऊन आम्ही कुटुंबियांकडून ध्यानधारणा करुन घेतो. यामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. महिलावर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. -उषाताई गायकवाड (परिचारिका, आरोग्य केंद्र)
पहिल्या दिवसापासून या उपक्रमामध्ये मी सहभागी आहे. उपक्रमापासून गावातील वातावरण बदलले आहे. एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी समजून घेण्याकडे कल वाढला आहे. दररोज काही मिनिटासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाच्या वागण्या-बोलण्यावरही जाणवतो आहे. - सुकेशनी बि-हाडे (ग्रामस्थ, कावलगाव)
कावलगाव येथील हॅपी व्हिलेज संकल्पनेत सक्रीय सहभाग आहे. आता जिल्ह्यातील इतर गावचे पदाधिकारीही उपक्रम राबविण्याची विनंती करीत आहेत. प्रा. प्रशांत गायकवाड (तज्ज्ञ प्रशिक्षक, विपश्यना)
ध्यानधारणेचा सकारात्मक परिणाम जाणवतो आहे, हे लक्षात येवू लागल्याने ग्रामस्थही रविवारी या साधकांची वाट पाहतात. - बालाजी वाघमारे (सरपंच, कावलगाव)
आनंदाचे मोजमाप
‘न्युरोबिक’ उपकरणाच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्ट्या सुखाच्या स्तराचे मोजमाप करण्यात आले. सध्या दोन हजार गावकऱ्यांच्या या माहितीचे सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण आणि वर्गीकरण करण्यात येतआहे. आणखी साधारण दहा महिने तेथे आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंद-सुखाचे वरील दोन्ही प्रकारे पुन्हा मोजमाप करण्यात येईल. पुढील टप्प्यात मेंदूचा आलेख (ईईजी) आणि रक्तातील तणाव निर्माण करणारे घटक यांचा अभ्यास करण्याचे नियोजन असल्याची माहिती डॉ. जोंधळे यांनी दिली.
आज माझ्या कुटुंबातील सुमारे १० ते १२ जण दररोज सकाळी ध्यानधारणा करतात. प्रत्येक घरात हा उपक्रम सुरू असून यामुळे गावात एकमेकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. - मारोतीराव पिसाळ, उपसरपंच
मला अनेक वर्षांपासून तंबाखूचे व्यसन होते. मी दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा आणि विपश्यना सुरु केल्यानंतर माझे मलाच आपण तंबाखू खातो ते चुकीचे आहे, हे पटले. आता या व्यसनापासून मी मुक्त झालो आहे. - निवृत्तीराव देशमुख, साधक
दर रविवारी घरोघरी जाऊन आम्ही कुटुंबियांकडून ध्यानधारणा करुन घेतो. यामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. महिलावर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. -उषाताई गायकवाड (परिचारिका, आरोग्य केंद्र)