'५ पर्यंत मोजतो अन् मग ठोकतो'; माजी मंत्री सावंत यांच्यावर घरात घुसून रोखले पिस्टल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:20 PM2022-05-30T17:20:25+5:302022-05-30T17:23:57+5:30
आरोपीने बंदूक कानाला लावली असतानाही सेवकाने झटापट करत आडवले
नांदेड- माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांच्या शिवाजीनगर स्थित घरात घुसलेल्या आरोपीने ५० हजार रुपयांची मागणी करीत त्यांच्यासह सेवकावर बंदूक रोखली. यावेळी सेवकासोबत झटापट करुन बंदूकीने डोक्यात मारुन जखमी करण्यात आले. प्रसंगावधान राखत सावंत हे दरवाजाच्या बाहेर पडले. त्याचवेळी धूम ठोकत असलेल्या आरोपीला कार्यकर्त्यांनी पाठलाग करुन पकडले. हा थरार सोमवारी दुपारी तीन साडे तीन वाजेच्या सुमारास घडला.
शिवाजीनगर भागात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या बंगल्यासमोरच माजी मंत्री डी.पी.सावंत यांचे घर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सावंत यांच्या भेटीसाठी जनता कॉलनी येथील साहिल माने हा तरुण येत होता. साहिल माने (रा.बीड ) असे नाव त्याने सांगितले होते. तसेच जमीनीच्या एका विषयाबद्दल सावंत यांची मदत मागितली होती. परंतु, सावंत यांनी बीड जिल्हा आपले कार्यक्षेत्र नसल्याचे सांगून त्याला परत पाठविले होते. सोमवारी सकाळपासूनच तो सावंत यांच्या घराजवळ फिरत होता.
सकाळच्या वेळी सावंत हे आयटीएम येथे असताना तो त्यांच्या घरी गेला. यावेळी सेवक सुभाष पवार (रा.आंतरगाव ता.नायगाव) यांनी साहेब आयटीएम येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी माने याने सावंत यांच्या पीएचा मोबाईल क्रमांक घेतला. परत जात असताना सावंत यांचे वाहन त्याला दिसले. सावंत हे दुपारी जेवण करुन हॉलमध्ये थांबले असताना स्वयंपाकगृहाच्या पाठीमागील दरवाजातून साहिल माने हा आत आला. येताच त्याने सेवक पवार यांना साहेब कुठे आहेत असे म्हणून बंदूक रोखली. अचानक बंदूक डोक्याला लावल्यामुळे पवार हे घाबरले होते. यावेळी दोघांमध्ये झटापट सुरु झाली. आरोपी माने याने बंदूक उलट्या बाजूने पवार यांच्या डोक्यात चार ते पाच वेळेस मारली. त्यामुळे पवार यांचे डोके फुटले.
हा सर्व गोंधळ सुरु असताना हॉलमध्ये असलेले सावंत स्वंयपाकगृहात आले. यावेळी आरोपी माने याने सावंत यांच्या दिशेने बंदूक रोखली. तसेच पैसे देत नसल्यास पवारला गोळ्या घालण्याची धमकी दिली. बोलत-बोलत सावंत यांच्या मागे आरोपी दरवाजापर्यंत आला. तोच सांवत यांनी दरवाजातून बाहेर पाय काढला. बाहेर कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे पकडल्याच्या जाण्याच्या भितीने आरोपी माने याने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु संतोष पावडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला पाठलाग करुन त्याला पकडले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात आरोपीला माने याला देण्यात आले. डीबीचे सपोनि रवि वाहूळे याने आरोपीची झाडाझडती घेवून बंदूक जप्त केली. ही बंदूक छरे चालविण्याची निघाली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाच पर्यंत मोजतो अन् मग ठोकतो
सावंत यांच्यापुढे आरोपी माने याने सेवक पवार यांच्या कानशिलाला बंदूक लावली होती. ५० हजार रुपये देता की नाही, असा सवाल करीत, पाच पर्यंत मोजतो अन् पवारला ठोकतो अशी धमकी त्याने दिली होती. यावेळी सेवक पवार यांनीही हिंम्मत दाखवित त्याच्यासोबत झटापट केली.
मी मेलो तरी चालते
स्वयंपाकगृहातून आरोपी अचानक मध्ये आले. साहेबांचे जेवण होवून ते हॉलमध्ये होते. त्याने येताच मला बंदूक दाखवून साहेबांकडे घेवून जाण्याची धमकी दिली. मी मेलो तरी चालते, पण साहेबांना काही होवू नाही म्हणून मी झटापट केली. त्याने माझ्या डोक्यात बंदूक मारुन डोके फोडले. अशी प्रतिक्रिया जखमी सेवक सुभाष पवार यांनी दिली.
माझ्यावर खुप दबाव होता
आरोपी साहिल माने हा बीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तो शहरातील यशवंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. काही जणांकडून उधारीवर ५० हजार रुपये घेतले होते. ते लोक पैसे दिले नाही तर, जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे सावंत यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेलो. मला सोडू नका माझे एन्काऊंटर करा असे आरोपी साहिल माने हा बडबडत होता.