नवरदेव बोहल्यावर चढताना अचानक प्रेयसी धडकली; बिंग फुटताच वधूच्या नातेवाईकांकडून नवरदेवाची धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 06:20 PM2019-06-15T18:20:17+5:302019-06-15T18:27:24+5:30
प्रेयसीच्या धक्कादायक खुलाशाने नववधूचे कुटुंबिय अव्वाक झाले़
नांदेड : सनई-चौघड्याच्या सुरात नवरदेवाचे लग्नमंडपात आगमन झाले़ आहेराच्या देवाण-घेवाणीनंतर नवरदेव बोहल्यावर चढणार तोच लग्नमंडपात त्याची प्रेयसी धडकली़ अन् नवरदेवाचे बिंग फुटले़ त्यामुळे संतप्त झालेल्या नववधूच्या नातेवाईकांनी नवरदेवाची यथेच्छ धुलाई करीत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले़
नांदेड शहरातील कौठा भागातील एका मंगल कार्यालयात शनिवारी ११ वा़५१ मिनिटांनी याच भागातील नववधू प्रिया (नाव बदलले) हिचा विवाह कळमनूरी तालुक्यातील दांडेगावच्या अरविंद जगदेवराव साखरे याच्याशी होणार होता़ नववधूकडील मंडळींनी लग्नाची जय्यत तयारी केली होती़ लग्नमांडवात दोन्ही बाजूंची वºहाडी मंडळीही जमली होती़ पाहुण्यांच्या सराबराईत सर्वजण व्यस्त होते़ दोन्हीकडच्या पाहुण्यांना आहेराची देवाण-घेवाण झाली़ थोड्याच वेळात नवरदेव अरविंद हा बोहल्यावर चढणार तोच त्याची प्रेयसी माया (नाव बदलले) ही लग्नमंडपात येवून धडकली़ तीने थेट नववधू प्रियाच्या कुटुंबियांना जावून वर अरविंद आणि माझे यापूर्वीच लग्न झाल्याचे व त्याने आपली फसवणुक केल्याची आपबिती सांगितली.
मायाच्या या धक्कादायक खुलाशाने नववधू मायाच्या कुटुंबिय अव्वाक झाले़ त्यानंतर नववधूच्या कुटुंबियांनी लगेच याबाबत वर अरविंद व त्याच्या कुटुंबियाला जाब विचारला़ यावेळी अरविंद याने मायाशी यापूर्वी प्रेमप्रकरणात होतो़ परंतु आमचे लग्न झाले नाही़ असे सांगताच नववधूच्या कुटुंबियांनी नवरदेव अरविंदची यथेच्छ धुलाई करण्यास सुरुवात केली़ काही वेळातच ही गोष्ट लग्नमंडप व परिसरात वाऱ्यासारखी पोहचली़ या ठिकाणी अरविंदची प्रेयसी असलेल्या माया हिने अरविंदसोबतच्या प्रेमप्रकरणाचे पुरावे दिले़. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले़. फसवणुक करणारा नवरदेव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती़
नववधूचा दुसऱ्या युवकाशी विवाह
दरम्यान, नियोजित वर अरविंद याच्याकडून फसवणुक झाल्यानंतर नववधूचे कुटुंबिय काळजीत पडले होते़ नववधूचे पित्याचे छत्र हरविले असून आईनेच शेती विकून तिच्या लग्नाची तयारी केली होती़ त्यामुळे आता नववधूचे कसे? या विवंचनेत सर्व जण होते़ तोच नववधूच्या नातेवाईकापैकीच एका मुलाने प्रिया हिच्याशी लग्नास होकार दिला़ त्यानंतर सायंकाळी सहा वाजता प्रियाचा त्या मुलाशी विवाह लावून देण्यात आला़ हा विवाह जुळावा यासाठी परिसरातील अनेकांनी प्रयत्न केले़