कधी संपणार व्यथा वडार समाजाची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 01:10 AM2019-05-12T01:10:32+5:302019-05-12T01:11:29+5:30
विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो़
कुरुळा : विज्ञान-तंत्रज्ञान युगात मानव चंद्रावर मार्गक्रमण करत असताना, देशप्रगतीच्या विकासाच्या वल्गना करत असताना मात्र दुसऱ्या बाजूला वर्षानुवर्षे हाती हातोडा घेऊन रखरखत्या उन्हात खडी फोडणा-या वडार समाजाच्या व्यथा मात्र त्यांच्या जन्मालाच पुजलेल्या आहेत की काय? असा प्रश्न निर्माण होतो़
सध्या सगळीकडे सूर्य आग ओकत आहे. तापमानाने आतापर्यंतचा उच्चांक मोडला आहे़ ४५ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचले आहे. उष्माघाताने शेकडो लोक आपला जीव गमावत आहेत. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी लोक कुलर, एसी लावून बसत आहेत़ मात्र वडार समाजाच्या बांधवांना मात्र टीचभर पोटाच्या खळगीसाठी ना उष्णतेचा विचार ना उष्माघात़ कारण रोज खडी फोडल्याशिवाय रात्रीची रोजीरोटी मिळत नाही़ म्हणून अशा उष्णतेच्या लाटेतसुद्धा त्यांना काम करावे लागत आहे.
कुरूळा ते नंदनशिवनी रस्त्याचे काम सुरु असून त्या ठिकाणी हे वडारबांधव भर उन्हात खडी फोडत आहेत. कोण त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडेल? ना शासन ना मिळते रेशन, सामाजिक बांधिलकीतून खरंच या समाजाच्या व्यथा समजून घेणे आवश्यक आहे. त्यांंच्या या व्यथा कुठेतरी थांबल्या पाहिजेत, अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या. एकूणच वडार समाजाची अजूनही अधोगती होत असल्याचे चित्र उपरोक्त प्रकारावरून दिसून येते़ शासनस्तरावर याकडे लक्ष देणे आवश्यक आहे़
दहाव्या वर्षांपासून काम
मी १० वर्षांचा होतो तेव्हापासून हा व्यवसाय करत आहे़ माझी बायको सावित्री हीसुद्धा खडी फोडण्याचे काम करते़ आम्हाला शेतीबिती नाही. यावरच आमची रोजीरोटी आहे. यावर्षीचा कडक उन्हाळा आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघितला़ हाताला कपडा बांधून काम करावे लागते
- किशन खोबराजी मंजीलवाड, (रा़ मौजे खुड्याचीवाडी, ता. कंधार, जि.नांदेड)