मदत वाऱ्यावर, रिक्षाचालकांना दीड हजार रुपये कधी मिळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:18 AM2021-05-08T04:18:06+5:302021-05-08T04:18:06+5:30
कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
कोरोना महामारीमुळे यंदाही रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षभरापासून लाॅकडाऊनच्या दुष्टचक्रात अडकलेल्या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. दरम्यान, रिक्षाचालकांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. १४ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार २० एप्रिल रोजी परिवहनमंत्र्यांनी रिक्षाचालकांना अर्थसाहाय्य देण्यासाठी रिक्षा पदाधिकारी व परिवहन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन परवानाधारक रिक्षाचालकांना दीड हजार रुपये देण्यासंबंधी नियोजन केले होते. मात्र, या घटनेला आता जवळपास २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही. रिक्षाचालक निधीची प्रतीक्षा करीत आहेत.
चौकट- रिक्षाचालकांच्या प्रतिक्रिया
१. मागील दोन महिन्यांपासून रिक्षा व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दीड हजार रुपये अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. तीसुद्धा वेळेवर दिली जात नाही. सगळेच अवघड झाले आहे. - मुखीद पठाण, पीरबुऱ्हाणनगर
२. मागील वर्षापासून ऑटोरिक्षा चालकांवर वाईट वेळ आली आहे. आमचे पोट तीन चाकावर आहे. मात्र, तेच बंद आहेत. त्यामुळे आमचे कुटुंब कसे जगवायाचे हा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. या काळात कोण किती मदत करणार. त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी. - माणिक भालेराव, महेबूबनगर.
३. राज्यातील प्रत्येक रिक्षाचालक शासनाच्या अनुदान निधीची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिक्षाचालकांची आर्थिक परिस्थिती दयनीय झाली आहे. दुसरीकडे कर्ज घेतलेल्या रिक्षाचालकांना हप्ते कसे फेडायचे, हा प्रश्न गंभीर वाटत आहे. त्यामुळे शासनाने रिक्षाचालकांसाठी भरीव मदत करावी. - अहेमद बाबा, जिल्हाध्यक्ष, टायगर रिक्षा संघटना, नांदेड.
४. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयभीत वातावरण झाले आहे. बाहेर पडावे तर कोरोनाची भीती, घरात बसावे तर पोटाची काळजी, अशा परिस्थिती जगायचे कसे, याचा मार्ग सापडत नाही. अशा वेळी शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे. - रमेश भालेराव. तरोडा खु., नांदेड.