पेसा क्षेत्रातील शाळा डिजिटल कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:06 AM2019-03-19T01:06:59+5:302019-03-19T01:08:35+5:30
पेसायुक्त गावातील शाळा डिजिटल करण्यासाठी थेट ग्र्रामपंचायतला राज्यपालांमार्फत निधी मिळाला असूनही गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील मदनापूर-करळगाव येथील जि.प.प्रा.शाळा डिजिटल होऊ शकली नाही.
नितेश बनसोडे ।
श्रीक्षेत्र माहूर : पेसायुक्त गावातील शाळा डिजिटल करण्यासाठी थेट ग्र्रामपंचायतला राज्यपालांमार्फत निधी मिळाला असूनही गेल्या अनेक वर्षांपासून माहूर तालुक्यातील मदनापूर-करळगाव येथील जि.प.प्रा.शाळा डिजिटल होऊ शकली नाही. मदनापूर- करळगाव या पेसा क्षेत्रातील शाळा डिजिटल कधी होणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
सन २०१४-१५ पासून पेसा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्वरूपाचा निधी ‘पेसा’ क्षेत्र असलेल्या ग्रा.पं.ला शासनामार्फत येत असतो. मात्र आलेल्या निधीचा वापर करण्याची जबाबदारी असणारे झारीतील शुक्राचार्य या निधीचा योग्य वापर करत नसल्याने अविकसित आदिवासीप्रवण भागातील नागरिकांना शासनाच्या विशेष सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे.
मदनापूर- करळगावची जि.प. प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी शासनाकडून स्थानिक ग्रा.पं.ला निधी प्राप्त झाला. मात्र, तत्कालीन ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे डिजिटल शाळेच्या कोणत्याही कामास सुरुवात केली नाही. सदर निधीतून शाळेला प्रोजेक्टर, संगणक संच खरेदी करणे व शाळेच्या भिंतीची रंगरंगोटी करणे व विविध बोलकी शैक्षणिक चित्रे भिंतीवर काढणे व विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देणे, आदी कामे करावी लागतात. मात्र, प्रत्यक्ष असे कोणतेही काम या पेसायुक्त ग्रा.पं.अंतर्गत मदनापूर-करळगावच्या शाळेत दिसून येत नाही.
त्यामुळे शासन जरी उद्दात हेतूने आदिवासी भागातील नागरिकांना जगाच्या स्पर्धेत आणण्यासाठी निधी देत असले तरी स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेने आदिवासीबहुल भागातील विद्यार्थी सुविधांपासून कोसोदूर राहत असल्याचे चित्र आहे.
पाच महिन्यांपूर्वी मदनापूर ग्रा.प.ची सार्वत्रिक निवडणूक झाली असून नवे कारभारी निवडून आले. त्यामुळे आता नव्या कारभाºयाकडून तरी शाळा डिजिटल करून मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र अद्यापतरी डिजिटल शाळा झाली नसल्याने गावकऱ्यांच्या अपेक्षांचा भंग झाला आहे. नव्या ग्रा. पं. पदाधिकाºयांनी मदनापूर- करळगावचे डिजिटल शाळेचे अडकून पडलेले काम मार्गी लावावे, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत. माहूर पं.स.चे विस्तार अधिकारी शरद तेलतुंबडे यांच्याशी संपर्क साधला असता दोन - चार दिवसांत शाळांना भेटी देऊ असे सांगितले आहे. असे असले तरी आजतागायत ग्रामस्थांनी याबाबत त्यांना अनेकवेळा अवगत केले असतानाही त्यांनी का दखल घेतली नाही? हा यक्षप्रश्न मात्र कायम आहे.
दरम्यान, मागील तीन वर्षांपासून शासनाकडून ग्रामपंचायतीला निधी प्राप्त होवूनही शाळा डिजिटल होवू शकली नाही़ संगणक संच खरेदी, शाळेच्या भिंतीची रंगरंगोटी, चित्रे आदी कोणतीच कामे अद्याप करण्यात आली नाही़ त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे़
आदिवासी भागातील विद्यार्थी सुविधांपासून वंचित
मदनापूर जि़ प़ शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चारोडे व करळगावच्या मुख्याध्यापिका डी.सी.पडोळे यांना विचारणा केली असता डिजिटल खोलीचे अपूर्ण साहित्य देण्यात येत असल्यामुळे आम्ही ते स्वीकारले नसल्याचे सांगितले. मला मदनापूर ग्रा.पं.ला रुजू होऊन एक महिनाच झाला असून ग्रा.पं. कार्यालयात मागील रेकॉर्डच उपलब्ध नाही. - शरद लाडेकर, ग्रामसेवक मदनापूऱ