जातीय पर्यावरण कधी सुधारणार? बोंढार गावातून जोगेंद्र कवाडे यांचा संतप्त सवाल
By शिवराज बिचेवार | Published: June 5, 2023 06:04 PM2023-06-05T18:04:18+5:302023-06-05T18:06:55+5:30
अक्षय भालेराव खून प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित कॉंग्रेस आमदार आणि पोलिसांवर कारवाई करावी.
नांदेड- राज्यात सत्ता परिवर्तन होते. परंतु जातीय मानसिकतेत फरक पडत नाही. आज जागतिक पर्यावरण दिन अख्ख्या जगात साजरा होत आहे. परंतु या राज्यातील जातीय पर्यावरण कधी सुधारणार आहे. एनसीआरबीच्या रिपाेर्टमध्ये देशातील अत्याचाराच्या प्रकरणात महाराष्ट्रात यंदा ११ टक्के वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शाहू-फुले-आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांच्या या भूमीत ही विदारक परिस्थिती आहे अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली.
सोमवारी बोंढार येथे मयत अक्षय भालेराव याच्या कुटुंबीयांची कवाडे यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी कवाडे म्हणाले, अक्षय हा भीमसैनिक धडाडीचा तरुण होता. यंदा पहिल्यांदाच त्याने गावात भीमजयंती काढली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोही ठेवला होता. परंतु काही जातीयवादी गुंडांना हे पाहवले गेले नाही. त्यातून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. पैसा आणि सत्तेची मस्ती यातून असे प्रकार घडत आहेत. परंतु याबाबत काँग्रेसचे स्थानिक नेतेही काही बोलण्यास तयार नाहीत, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देऊन अशा प्रकारच्या प्रवृत्ती फोफावणार याची काळजी घेण्याची गरज आहे. असेही कवाडे म्हणाले.
काँग्रेस आमदाराने आरोपींना दिला आश्रय
काँग्रेसच्या एका आमदाराने आरोपींना आश्रय दिला. नंतर स्वत:हून त्यांना हजर केले. तसेच काही पोलिस अधिकारीही गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची माहिती हाती आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून संबंधित आमदार आणि पोलिसांवर कारवाई करावी. तसेच मयत भालेरावच्या कुटुंबाला २५ लाखांची मदत द्यावी अशी मागणी कवाडे यांनी केली.
दक्षता समितीच नाही
ॲट्राॅसिटी कायद्यात तरतूद आहे. राज्यभरात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटनांवर निगराणी ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करावी. परंतु अशी समितीच अद्याप स्थापन करण्यात आली नाही. जीवन-मरणाच्या या प्रश्नाकडे सत्ताधारी, पोलिस आणि प्रशासन या सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे कवाडे म्हणाले.