मोडकळीस आलेल्या शाळा कधी होणार दुरुस्त? चिमुकले, शिक्षक जीव मुठीत घेऊन बसतात
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: June 13, 2024 06:37 PM2024-06-13T18:37:09+5:302024-06-13T18:46:24+5:30
चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागणार ज्ञानार्जनाचे धडे
नांदेड : शाळा सुरू होण्याला दोन ते तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना अद्यापही जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळेच्या इमारती असून वर्गखोल्याही मोडकळीस आलेल्या आहेत. परंतु, असे असताना अजूनही दुरुस्तीसाठी शासनाकडून शाळांना निधी प्राप्त झालेला नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जनाचे धडे गिरवावे लागणार आहेत.
जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक अशा एकूण २ हजार १९५ जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या आहे. त्यामध्ये ७० शाळा माध्यमिक आहेत. एकूण शाळांमध्ये जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतात. शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा मिळाव्यात, अशी प्राथमिक मागणी असते. परंतु, अनेक शाळांच्या इमारती जुन्या असून, वर्गखोल्याही जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे म्हणजे जीव धोक्यात घालून बसावे लागते. यासाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येते. परंतु, शासनाकडून मिळणारा निधी वेळेवर येत नसल्याने शाळा दुरुस्ती शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी होत नाही. त्यामुळे छत गळक्या, मोडकळीस आलेल्या शाळांतच जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.
२२५ शाळांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या तब्बल २२५ शाळांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून शासनाकडे शाळा दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. पण, शैक्षणिक सत्र सुरू होत असले तरी अद्याप शाळांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही.
जिल्ह्यात ३४६ नवीन वर्गखोल्यांचा प्रस्ताव शासनाकडे सादर
जिल्ह्यात ३४६ नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात यावे, यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. परंतु, अजूनही नवीन वर्गखोल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन वर्गखोल्या कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
नवीन वर्गखोलीसाठी ११.५० लाखांची तरतूद
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नवीन वर्गखोली बांधकामासाठी शासनाकडून प्रति वर्गखोली ११ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला जातो. तर वर्गखोली दुरुस्तीसाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली जाते. शाळांची दुरुस्ती शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक आहे. परंतु, अद्याप निधीच मंजूर झाला नसल्याने नवीन वर्गखोल्या आणि दुरुस्ती कधी होणार हा प्रश्न आहे.