पांढरं सोनं कधी झळाळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; महागाईत कापूस अर्ध्या किंमतीत विकला

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: March 12, 2024 04:46 PM2024-03-12T16:46:19+5:302024-03-12T16:48:10+5:30

नांदेड जिल्ह्यात ३.८४ लाख क्विंटल कापूस खरेदी : खासगी व्यापाऱ्यांकडून ७४०० पर्यंत भाव

When will the white gold shine, the farmers have to wait; Cotton sold at half price during inflation | पांढरं सोनं कधी झळाळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; महागाईत कापूस अर्ध्या किंमतीत विकला

पांढरं सोनं कधी झळाळणार, शेतकऱ्यांना प्रतीक्षाच; महागाईत कापूस अर्ध्या किंमतीत विकला

नांदेड : जिल्ह्यातील विविध नऊ खरेदी केंद्रांवर सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांकडून १२ मार्चपर्यंत ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून हळदीचे दर १७ हजार पार गेले असले तरी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाला या वर्षात ६,५०० ते ७,४०० रुपये प्रतिक्विंटलचाच दर मिळाला. त्यामुळे पांढरे सोने कधी झळाळणार, याची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा आहे.

यावर्षी सुरुवातीला वेळेवर पाऊस पडला नसल्याने कापसाची लागवड उशिराने झाली होती. त्यामुळे कापूस वेचणीलाही विलंब झाला; पण मागील तीन महिन्यांपासून कापूस विक्रीसाठी बाजारात आलेला असून, १२ मार्चपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ७४७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आलेली आहे. त्यात खासगी व्यापाऱ्यांनी ६,७०० ते ७,४०० रुपयांचा भाव मिळाला. मागील दोन ते तीन वर्षांपूर्वी कापसाला १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता. मात्र, यंदा साडेसात हजारांपेक्षा जास्त दर वाढले नाहीत. कापसाचे उत्पादन कमी असले तरी दर का वाढत नाहीत, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य पणन महासंघाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.

‘सीसीआय’ची ७१ हजार ६२७ क्विंटल खरेदी
जिल्ह्यात ‘सीसीआय’ने भोकर, धर्माबाद, तामसा (हदगाव), नांदेड, नायगाव, कुंटूर, बिलोली, किनवट व माहूर या ठिकणी नऊ खरेदी केंद्र सुरू केले आहेत; पण १२ मार्चपर्यंत धर्माबाद ३४ हजार क्विंटल, तामसा ६,५०० क्विंटल, नांदेड ३,८३३ क्विंटल, नायगाव १५,२६० क्विंटल, कुंटूर ११,६२२ क्विंटल, किनवट ४१२ क्विंटल याप्रमाणे ७१ हजार ६२७ क्विंटल आजतागायत खरेदी झालेली आहे.

भोकर केंद्रावर सर्वाधिक खरेदी
जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून भोकर केंद्रावर सर्वाधिक १ लाख ८३ हजार ३३९ क्विंटल खरेदी करण्यात आली आहे. कापसाला ६,५०० ते ७,४०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर भोकर पाठोपाठ धर्माबाद खरेदी केंद्रावर ४७ हजार ५९८ क्विंटल, तामसा ८१ हजार ८५४ क्विंटल तर नांदेड येथील खरेदी केंद्रावर ३२९ याप्रमाणे एकूण ३ लाख १३ हजार १२० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

यंदा कापसाचा उतारा घटला
जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला.

काही राज्यांत एमएसपीपेक्षा जादा दर
केंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत. तसा कुठलाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारांवर गेले होते; पण यंदा शासनाने कापसाला अधिक भाव मिळावा, यासाठी कुठलाच निर्णय घेतला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.

Web Title: When will the white gold shine, the farmers have to wait; Cotton sold at half price during inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.