वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत कधी धावणार? प्रवाशांना प्रतीक्षा, लोकप्रतिनिधी चिडीचूप
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: August 10, 2024 07:04 PM2024-08-10T19:04:01+5:302024-08-10T19:04:56+5:30
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधीही चिडीचूप
नांदेड : वंदे भारत एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्धद्रूतगती इलेक्ट्रिक मल्टीयुनिट रेल्वेसेवा आहे. ही रेल्वेगाडी सर्व सोयी-सुविधायुक्त असून, प्रवाशांसाठी आरामदायी आहे. वंदे भारत ही जालना ते मुंबई, अशी मागील एक वर्षापासून सुरू करण्यात आली असली, तरी अद्याप नांदेडला सुरू झालेली नाही. त्यामुळे ही गाडी नांदेडपर्यंत कधी धावणार? याची प्रतीक्षा प्रवाशांना लागली आहे.
सध्या नांदेड रेल्वेस्थानकावरून एक्स्प्रेस, पॅसेंजर अशा एकूण ९४ गाड्या धावतात. तर, नांदेड स्थानकावरून १७ रेल्वेगाड्या मुंबई, पुण्यासह अन्य शहरांत सुरू आहेत. परंतु, नांदेडहून सर्वात जास्त मुंबई, पुणे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांची गरज आहे. पण, सध्या नांदेड येथून मुंबईसाठी राजाराणी, नंदीग्राम, देवगिरी, तपोवन व पनवेल या पाच गाड्या जातात, तर पुण्यासाठी व्हाया औरंगाबाद एक व व्हाया लातूर एक, अशा दोन गाड्या सोडण्यात येतात. परंतु, अनेकदा प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेमध्ये आरक्षित जागेवरही प्रवाशांची घुसखोरी होत असते. त्यामुळे आरक्षित सीट केलेल्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो. वंदे भारत रेल्वेगाडी नांदेडपर्यंत धावल्यास परभणी, नांदेडकरांसाठी सोयीचे होणार आहे. तसेच ९ ते १० तासांच्या आत मुंबईला जाता येईल.
नांदेड-परळ गाडीची मागणी
मुंबई स्थानकावर प्लॅटफार्मची कमतरता असल्याने नियमित गाड्यांपेक्षा प्रवाशांची मागणी असूनही अतिरिक्त गाडी सोडली जात नाही. त्यासाठी नांदेडहून परळ गाडीची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या परळ येथील वर्कशॉपच तोडले असून, त्याठिकाणी १० प्लॅटफॉर्मचे रेल्वेस्टेशन उभारले जात आहे. त्यासाठी नांदेडहून मुंबईला जाणा-या प्रवाशासाठी नांदड-परेल गाडी सुरू करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.
आरक्षित डब्यातील घुसखोरी थांबणार
यापूर्वी रेल्वेगाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट संपल्यानंतर आरएसी आणि त्यानंतर वेटींग तिकीटही मोठ्या प्रमाणात काढण्यात येत होते. परंतु, आता रेल्वे विभागाने आरक्षण काढलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी वेटींग लिस्ट १ जुलै २०२४ पासून कमी केली आहे. त्याचा परिणाम तिकीट काढल्यानंतर जास्त वेटींग राहत नसल्याने प्रवाशांचे तिकीट वेळीच कन्फर्म होण्यास मदत होणार आहे.
म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाही
वंदे भारत रेल्वे नांदेडपर्यंत आणण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून म्हणावा तसा पाठपुरावा होताना दिसत नाही. त्यामुळे जालन्यापर्यंत आलेली वंदे भारत नांदेडपर्यंत कधी धावणार ? असा प्रश्नही प्रवासी विचारत आहेत.