सुविधा नसतील तिथे शिक्षणमित्र व विद्यार्थीमित्र असतील; सर्वांनाच शिक्षणाच्या प्रवाहात आणू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 06:59 PM2020-09-16T18:59:08+5:302020-09-16T18:59:44+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे शिक्षकांनी उद्दिष्ट ठेवावे
नांदेड : जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे ई-संवादाच्या माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. इंटरनेट, मोबाईल, दूरदर्शन, आकाशवाणी, यु-टयूब, व्हॉटसअॅप या माध्यमांचा वापर आता ग्रामीण भागातही शिक्षक आणि विद्यार्थी अत्यंत प्रभावीपणे करत आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे या सुविधा उपलब्ध नाहीत, असा एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याचे नियोजन शिक्षण विभागाकडून केले जात असून जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत शिक्षण पोहोचावे यासाठी प्रयत्नरत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवनात आयोजित शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, आमदार अमरनाथ राजूरकर, भीमराव केराम, राजेश पवार, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, शिक्षण सभापती संजय बेळगे व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी. आर. कुंडगिर व प्राथमिक शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांची उपस्थिती होती.
काही जिल्ह्यांमध्ये विविध सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी, सेवानिवृत्त शिक्षकांनी शासनाचे निकष पाळून मोकळ्या जागेत आपआपल्या भागातील मुलांना शिकविण्याचे प्रयोग सुरु केले आहेत. या धर्तीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून जर कुठे कोणी प्रयत्न करत असेल तर त्यातील उदात्त दृष्टिकोन आपण लक्षात घेतला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात जिथे इंटरनेटची सुविधा नसेल तेथे शिक्षणमित्र व विद्यार्थीमित्र तयार करुन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.