ऑफरमध्ये घेतलेल्या मोबाईवर गेम खेळताना स्फोट, चिमुकल्याचा हात गमावला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 09:18 PM2019-02-10T21:18:25+5:302019-02-10T21:19:29+5:30
मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा तांडयावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्यांने टि.व्ही. वरील मोबाईलची जाहीरात पाहून मोबाईल ऑनलाइन मागणी केली.
नांदेड- ऑनलाईन मागवलेल्या मोबाईलमध्ये गेम खेळताना स्फोट झाल्याने आठ वर्षाच्या मुलाला हात गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नांदेड जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जिरगा गावात हा प्रकार घडलाय. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुखेड तालुक्यातील कमलातांडा जिरगा तांडयावरील श्रीपत जाधव या शेतकऱ्यांने टि.व्ही. वरील मोबाईलची जाहीरात पाहून मोबाईल ऑनलाइन मागणी केली, जाहीरातीमध्ये १५००/ -रुपयाला तीन मोबाईल त्यावर एक घडयाळ मोफत असल्याची आय कॉल के ७२ (I KALL k72) या कंपनीची जाहीरात पाहून मोबाईलची मागणी केली, त्या तीन मोबाईल पैकी एक मोबाईल गेल्या एक ते दिड महिन्यांपासुन वापरात होता. त्या मोबाईलवर त्यांचा मोठा मुलगा प्रशांत श्रीपत जाधव (८) वर्ष हा नेहमीप्रमाणे गेम खेळत बसला असता, अचानक मोबाईलचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात ज्या डाव्या हातात मोबाईल होता त्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे अक्षरश: उडून पडली. तर तळहात छिन्नविछिन्न झाला आहे. मोबाईलचे तुकडे छातीता, पोटाला लागुन तेथेही दुखापत झाली आहे. या स्फोटात दैव बल्लवत्तर म्हणून हातावरच वेळ निभाऊन गेली, पण हात कायमचा निकामी झाला. त्या मुलावर बाऱ्हाळी येथील डॉ. प्रविण गव्हाणे यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर उदगीर येथिल खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयावर मोठा आर्थिक व मानसिक बोजा पडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोबाईलपासून एका तांड्यावरील शेतकरी कुटुंबातील मुलाला कायमचे अपंगत्व आले आहे. या घटनेनंतर बाऱ्हाळी परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.