पिवळ्या सोन्यापुढे पांढरे सोने पडले फिके; कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: April 12, 2024 02:53 PM2024-04-12T14:53:26+5:302024-04-12T14:53:38+5:30
शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे.
नांदेड : शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाचे भाव यावर्षी साडेसात हजारांपर्यंतच स्थिरावलेले आहेत. असे असताना पिवळ्या सोन्याने मात्र गगनभरारी घेतली असून भाव झपाट्याने वाढले. आजघडीला नांदेडच्याबाजारपेठेत कापसापेक्षा सोन्याला दहा पटीने अधिक दर मिळताहेत. त्यामुळे पिवळ्या सोन्यापुढे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र फिके पडल्याचे दिसून येते.
शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून उत्पादन हाती येईपर्यंत भरमसाट खर्च करावा लागतो. त्या तुलनेत खर्च वजा जाता पदरात काहीच पडत नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे आभूषण म्हणून सोन्याला महिला अधिक पसंती देतात. गुंतवणूक म्हणूनही सोन्याची खरेदी केली जाते. दिवसेंदिवस दर वाढत असले तरी सोन्याची उलाढाल काही कमी झालेली नाही. एकेकाळी प्रतितोळे सोने आणि प्रतिक्विंटल कापसाचे भाव सारखेच होते. पण, कालांतराने सोन्याचे भाव वाढत गेले अन् कापसाचे भाव अनेक वर्ष स्थिरावलेलेच राहिले.
नांदेड जिल्ह्यात २०१० मध्ये कापसाचे भाव दोन हजार रुपये इतके होते. तर सोन्याचे भाव १६,५०० रुपये होते. पण मागील १५ वर्षांतच कापसाचे भाव तीन पटीने तर सोन्याचे भाव साडेचार पटीने वाढल्याचे पाहायला मिळते. २०१२ मध्ये कापसाचे भाव ३,१०० रुपये तर सोन्याचे भाव २८ हजारांवर पोहोचले होते. यावरून मागील दहा वर्षांत कापसापेक्षा सोन्याचे भाव अधिक पटीने आणि झपाट्याने वाढल्याने सोने खरेदी सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च यातील तफावत वाढत गेली आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत गेली. जेवढा कापूस अधिक तेवढ्या आत्महत्या अधिक असे चित्र राज्यात दिसू लागले.
कापसाचे भाव निम्यावरच
कापसाला मागील तीन वर्षांपूर्वी १३ हजारांपेक्षा अधिक भाव मिळाला होता.मात्र, त्यानंतर दरवर्षी कापसाचे भाव उतरत गेले आणि सध्या साडेसात हजारांहून अधिक दर वाढले नाहीत. त्या तुलनेत सोन्याच्या दराने मात्र मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे तीन वर्षांत कापसाचे भाव वाढण्याऐवजी निम्यावरच आले आहेत.
कापसाचा उताराही घटला
जिल्ह्यात यावर्षी कापसाच्या पिकाला पावसाचा खंड व नंतर अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे फळधारणा कमी होऊन नंतर बोंडे काळवंडल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट येत आहे. अनेक शेतकऱ्यांना एका बॅगला तीन ते चार क्विंटलच कापूस निघत असल्याने त्यांनी लागवडीसाठी टाकलेला खर्चही पदरातून करावा लागला आहे.
काही राज्यात एमएसपीपेक्षा जादा दर
केंद्र शासनाने काही राज्यात एमएसपीपेक्षा ३० ते ४० टक्के दर अधिक जाहीर केले आहेत.पण, सध्या कापसाला मिळत असलेला दर केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एमसपीपेक्षा कमी आहे.दोन वर्षांपूर्वी कापसाचे भाव १३ हजारावर गेले होते.पण,यंदा सात ते साडेसात हजारांतच कापूस विक्री करावा लागतो आहे.
१९७२ ला होता ३२० रुपये भाव
१९७२ मध्ये चांगल्या दर्जाच्या कापसाला ३२० रुपये प्रतिक्विंटल इतका भाव होता. त्यानंतर कापसाचा दर एक हजार रुपयापर्यंत होण्यासाठी १८ वर्षांचा कालावधी लागला. १९९१-९२ मध्ये प्रतिक्विंटल १,१३४ रुपयांचा भाव मिळाला होता. तर १९१९ मध्ये ५,५५० रुपये इतका होता. त्यानंतर तब्बल पाच वर्षांत मात्र, दोन हजार रुपये इतकेच दर वाढले. उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव यातील निव्वळ नफा तुलनेने कमीच असल्यामुळे मराठवाड्यासह राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.