आता दंड कोणाला ? प्रशासन आपल्या दारी उपक्रमात मोठी गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 06:43 PM2021-02-27T18:43:03+5:302021-02-27T18:43:47+5:30
corona virus कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना गर्दी होणारा उपक्रम रद्द करण्याऐवजी राबविण्यात आल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे.
हदगाव : कोरोनाचे संकट पुन्हा थैमान घालत आहे. यामुळे गर्दी टाळण्याचे प्रशासनाने आदेश दिले आहेत. मात्र, आष्टी गावात 'प्रशासन आपल्याला दारी' हा उपक्रम शुक्रवारी ( दि. २६ ) घेऊन शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी कोरोना नियमांची पायमल्ली केली. कोरोनाचा प्रसार झाला तर त्याला जबाबदार कोण ? आता कोणाला दंड लावण्यात येणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
ग्रामस्थांना तालुकास्तरीय शासकीय कागदपत्रे गावातच मिळवीत यासाठी' प्रशासन आपल्या दारी' हा उपक्रम जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सुरु केला आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने सर्व मोठे कार्यक्रम रद्द करून गर्दी न करणे, सोशल डीस्टन्सिंगचे पालन करण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. परंतु,'प्रशासन आपल्या दारी' उपक्रम आष्टी गावात घेतल्याने तालुका प्रशासनाला कोरोना नियमांचा विसर पडल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असताना गर्दी होणारा उपक्रम रद्द करण्याऐवजी राबविण्यात आल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी येथे मोठी गर्दी केली होती. त्यात अधिकजण विनामास्कच होते. शिवाय दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतरही नव्हते.
कार्यक्रमात तहसिलदार जिवराज डापकर, बिडीओ केशव गड्डापौड यांच्या गळ्यात मास्क होता. तर आजीमाजी आमदार विनामास्कच सहभागी होते. प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतीनिधीच मास्क वापरत नसतील तर जनतेला काय संदेश जाणार दंड वसूल करणारेच नियमबाह्य वागत असल्याने आता यांना कोण दंड लावणार असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे. नियमांचे पालन करुनच हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोना प्रादुर्भावाची स्थिती जिल्हाधिकारी यांना कळवून पुढील कार्यक्रम रद्द करु अशी माहिती प्रभारी उपजिल्हाधिकारी तथा हदगावचे तहसीलदार जीवराज डापकर यांनी दिली.