महाभारतामधील विनाशाचे ‘उत्तरदायित्व’ कोणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:29 AM2018-02-23T00:29:51+5:302018-02-23T00:30:02+5:30
महाभारत कोणामुळे झाले असे सहज विचारले तर उत्तर मिळते द्रोपदीमुळे. पण हे सत्य आहे का? यात झालेल्या विनाशाचे उत्तरदायित्व कोणाचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘उत्तरदायित्व’ या नाट्यप्रयोगातून कलावंतांनी केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाभारत कोणामुळे झाले असे सहज विचारले तर उत्तर मिळते द्रोपदीमुळे. पण हे सत्य आहे का? यात झालेल्या विनाशाचे उत्तरदायित्व कोणाचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘उत्तरदायित्व’ या नाट्यप्रयोगातून कलावंतांनी केला आहे़
शंकरराव चव्हाण सभागृह येथे अमृततुल्य जीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नाशिकच्या वतीने विद्याधर निरंतर लिखित, रोहित पगारे दिग्दर्शित ‘उत्तरदायित्व’ या नाट्य प्रयोगाचे सादारीकरन झाले.
द्रोपदी आणि सर्वसामान्य स्त्री भार्गवी जिच्यावर युद्धकाळात असंख्य अन्याय, बलात्कार झाला आणि त्यातून जन्माला आलेले मुल त्याचे उत्तरदायित्व कोण असा प्रश्न करत ती द्रोपदीकडे येते़ त्यांच्या या संवादातून महाभारतात झालेल्या युद्धाला कोण जबाबदारे, सर्वसामान्यांना, महिला, मुलींना युद्धामुळे भोगावे लागणारे परिणाम, बेघर झालेल्या स्त्रीया, स्त्रीया-मुलींवर होणारे बलात्कार यातून जन्माला येणाºया मुलांचे काय आणि त्यांचे पालकत्व कोण स्विकारणार असे असंख्य प्रश्न पुढे येतात़ नाटकात तेजस्वी देव यांनी साकारलेली भार्गवीची भूमिका लक्षवेधी ठरली़ भार्गवीवर झालेल्या अत्याचाराचे उत्तरदायित्व कुणाचे या प्रश्नाच्या उत्तरासाठी तिने द्रौपदीकडे मांडलेली तिची व्यथा, तिच्यावर झालेला अत्याचार आदी एकूण प्रेक्षकांच्या अंगावर काटे येत होते़ या संवादातून नाटकाचा एक एक पैलू उलघडत जातो. राजसत्तेच्या आसक्ती पोटी राष्ट्रा-राष्ट्रात युद्ध होत. युद्ध हे सत्ता प्राप्तीसाठी आसुसलेल्या सत्ताधाºयांची असत पण यात नाहक बळी जातो तो सैनिकांचा, तरुण जनता युद्धात मारली जाते.
राष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचे युद्ध म्हणजे महाभारत, महाभारताच्या युद्धावर आधारित या नाटकाच्या सादीकरणाने रसिक भारावून गेले़
या नाटकात कलाकार म्हणून अजय तारगे, किरण जायभावे, कृतार्थ कंसारा, तेजस्वी देव, तिष्या मुनवर, प्रतिक विसपुते, विश्वंभर परवल, निलेश राजगुरू, प्रसाद काळे, अभिजित लेंडे, रोहित पगारे, प्रथमेश घुगे, मंजुषा फणसळकर, धनंजय निकम, सागर काची यांनी आप आपली भूमिका उत्तम साकारली. सदर नाटकाचे नेपथ्य निलेश राजगुरू यांनी सूचक आणि आशयपूर्ण साकारले़ तर संगीत- रोहित सरोदे, प्रकाशयोजना- रवी रहाणे, वेशभूषा- आनंद जाधव, रंगभूषा- माणिक कानडे यांनी साकारली.
एलेगोरियामुळे जागवल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी
कुसुम सभागृह येथे दुपारी चार वाजता अमर हिंद मंडळ, दादर, मुंबईच्या वतीने मनाली काळे लिखित अजित भगत दिग्दर्शित ‘एलगोरिया दि लेडी ओर दि टायगर’ या नाट्य प्रयोगाचे सदरीकरण झाले. एलेगोरिया या शब्दाचा ग्रीक अर्थ म्हणजे दंतकथा पण अशी दंत कथा जी करमणूक करताकरता प्रबोधन करून जाते. भारतात जसे रामायण, महाभारत तसेच त्यांच्यासाठी एलेगोरिया या शब्दाला महत्व आहे. नाटकातल्या प्रसंगातून, दृश्य बांधणीतून दंतकथेत आढळणारा ‘स्वप्नाळूपणा’ दर्शविण्याचा प्रयत्न केला गेला. नाटकातील सर्व मुख्य पात्र हि ग्रीक देव देवतांची नावे व त्यांचे स्वभाव रेखाटतात. नाटकाचा बाजही ग्रीक रंगभूमीवर आधारित असल्याकारणाने. ग्रीक रंगभूमीवर आढळणारे संगीत, नृत्य, वेशभूषा, रंगभूषा, कोरस यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला.मानवाच्या स्वभावातील विविध छटा दाखवता दाखवता ग्रीस मध्ये त्या काळी घडणारी क्रांती त्या देशातल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय उलथा पालथ याच प्रतिनिधित्व हे नाटक करते. प्रत्येक देशाची जडणघडण जरी भिन्न असली तरी तिथे राहणारी माणसे, त्यांचे स्वभाव, क्रांतीची गरज, देशप्रेमाची उर्मी या सर्व गोष्टी मात्र समान आहेत. ग्रीस देशाची हि कथा पाहता पाहता कुठेतरी ती आपल्याला भारतातील राज्यक्रांतीची, देशप्रेमाची, स्वातंत्रलढ्याची आठवण करून देते. या नाटकात सुभाष तोडणकर, चंदन जमदाडे, अमित सोलंकी, अश्वजीत फुले, आदित्य आंब्रे, तृप्ती जाधव, प्रियंका जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या तर सह कलाकार म्हणून दीपक गिरकर, गणेश गवारी, धीरज लोखंडे, अरुण बेल्हेकर, विजय ठाकरे, गजानन परब, नितीन जाधव, शुभम हळदनकर, ऐश्वर्या सक्रे, प्रशिता वरळीकर, पूनम प्रधान, रिता परब, नेत्रा भडकमकर, प्रीती शिंदे, आरती परब, रश्मी सहस्त्रबुद्धे, वैजयंती कोकणे, रोहित कांबळे, विवेक गुरुंगले यांनी काम पाहिले.