भाजपातील गटबाजी रोखणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:15+5:302021-07-20T04:14:15+5:30

एकतर्फी कारभाराला विरोध : जिल्हाध्यक्षांना तर ‘व्हाॅईस’च नाही नांदेड : एक खासदार, तीन आमदार व एक विधान परिषद सदस्य ...

Who will stop factionalism in BJP? | भाजपातील गटबाजी रोखणार कोण?

भाजपातील गटबाजी रोखणार कोण?

googlenewsNext

एकतर्फी कारभाराला विरोध : जिल्हाध्यक्षांना तर ‘व्हाॅईस’च नाही

नांदेड : एक खासदार, तीन आमदार व एक विधान परिषद सदस्य असे साम्राज्य लाभलेल्या जिल्हा भाजपात नेत्यांमध्येच मोठ्या प्रमाणात गटबाजी पहायला मिळते. पक्षश्रेष्ठींच्या केवळ दौऱ्याच्या वेळी एकत्र दिसणारी ही नेतेमंडळी इतर वेळी मात्र विखुरलेली असते. जिल्हा भाजपात असलेली ही गटबाजी थांबविण्यासाठी श्रेष्ठींकडूनही जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात नाही, हे विशेष. ते पाहता श्रेष्ठींनाही या नेत्यांच्या भांडणातच अधिक रस नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते.

प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड लोकसभेचा गड काबीज केला. विधानसभा निवडणुकीतही मुखेड, किनवट, नायगाव हे विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम व आमदार राजेश पवार यांच्या माध्यमातून भाजपाने राखले. याशिवाय राम पाटील रातोळीकर यांच्या रुपाने एक विधान परिषद सदस्यपदही जिल्हा भाजपाच्या वाट्याला आहे. राजकीय दृष्ट्या हे साम्राज्य बरेच मोठे आहे. त्या बळावर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, ग्रामपंचायती काबीज करणे भाजपासाठी कठीण नव्हते. परंतु प्रत्यक्षात तेथे भाजपाला अपेक्षित यश मिळविता आले नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भाजपाची सत्ताही काँग्रेसने हिसकावून घेतली. या अपयशामागे जिल्हा भाजपातील गटबाजी हे प्रमुख कारण सांगितले जाते.

जिल्हा भाजपामध्ये खासदार आणि महानगर प्रमुख हेच काय ते बोलतात, इतरांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे कार्यकर्ते सांगतात. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना तर जणू व्हॉईसच उरलेला नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पक्षाकडून आलेला अजेंडा राबवायचा असेल, जिल्हा मुख्यालयी आंदोलन करायचे असेल तर खासदार व महानगर प्रमुखच प्रकर्षाने दिसतात. पक्षाचे आमदार व इतर नेते-पदाधिकाऱ्यांची अप्रत्यक्षरित्या याकडे पाठ असते. अशावेळी ही नेतेमंडळी आपआपल्या कार्यक्षेत्रात आंदोलने करून मतदारसंघ आणखी बळकट करण्याचा प्रयत्न करतात. यातील कुण्या आमदाराला नागपुरातून तर कुणाला बीडमधून पक्षांतर्गत पाठबळ मिळत असल्याने हे नेते गटबाजी संपवून पक्षवाढीच्या दृष्टीने फारसे गंभीर नाहीत. किनवटच्या आमदाराचे तर महिनोन् महिने नांदेडमध्ये दर्शनही होत नसल्याचे कार्यकर्ते सांगतात. त्यांचा काँग्रेसला फारसा विरोध न करता अप्रत्यक्षरित्या काँग्रेससोबत आतून जुळवून घेण्याच्या भूमिकेने किनवट मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते कायम संभ्रमात पहायला मिळतात.

आमदार व पदाधिकाऱ्यांचा खासदारांच्या एककल्ली कारभाराला तीव्र विरोध आहे. या कारभारातूनच जिल्हा भाजपामध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाच्या संयुक्त कार्यक्रमाच्या वेळी आणि विशेषत आंदोलनांच्या वेळी ही दुफळी प्रकर्षाने पहायला मिळते. नेत्यांमधील गटबाजीमुळे भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. नेमका कोणत्या नेत्याचा झेंडा हाती धरावा याचा पेच निर्माण झाला आहे. अखेर या गटबाजीला कंटाळून अनेक कार्यकर्त्यांनी घरात बसणे पसंत केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाचे तिकीट वाटप असो की, जिल्हा व तालुका समित्यांवरील नेमणुका असो, तेथे मर्जीतील कार्यकर्त्यालाच प्राधान्य दिले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर मात्र सातत्याने या बाबतीत अन्याय पहायला मिळतो. निष्ठावंतांना डावलून जी-हुजरी करणाऱ्यांनाच लाभाची पदे दिली जातात, अशी ओरड आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपाची कोणतीही रणनीती पहायला मिळत नाही. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने सपाटून मार खाल्ला. त्यानंतरही भाजपाने धडा घेतला नाही. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी भाजपातून काही विशेष रणनीती पहायला मिळत नाही. आयता उमेदवार शोधण्याचा प्रयत्न आहे. त्यातही शिवसेनेच्या एका अनुभवी नेत्याला गळाला लावण्याची व्यूहरचना केली जात आहे. पोटनिवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. तेथे फोकस निर्माण करून आंदोलने केली जात आहे. मात्र भाजपाने तेथे आक्रमक आंदोलन उभारण्याचीही तसदी घेतलेली नाही. भाजपातील ही मरगळ व गटबाजी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती सोपविण्यास कारणीभूत ठरण्याची हुरहूर भाजपाच्या गोटातून ऐकायला मिळते.

चौकट ........

भाजपाचे नेते काँग्रेसच्या व्यासपीठावर

भाजपाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांना नुकतेच काँग्रेसच्या एका व्यासपीठावर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. या कार्यक्रमाचे निमित्त कौटुंबिक असले तरी खतगावकर यांनी केलेले भाषण आणि त्यात ‘मी अशोकराव चव्हाणांना खरोखरच घाबरतो’ अशा शब्दात दिलेली कबुली याचीच जिल्ह्याच्या राजकीय गोटात अधिक चर्चा होताना दिसते. कार्यक्रमस्थळीही ‘भास्करराव तुम्ही खरेच बोलला आणि पहिल्यांदाच स्वत:हून कबूल केले हे अधिक चांगले झाले’ असा प्रतिसाद उपस्थितांमधून लगेच ऐकायला मिळाला.

Web Title: Who will stop factionalism in BJP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.