शॉर्टसर्किटमुळे होलसेल दुकानाला आग; १६ लाखांच्या कॅन्डी-बिस्कीटांची राख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 01:26 PM2022-11-02T13:26:47+5:302022-11-02T13:27:16+5:30
आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले, तसेच शेजारील घरानां देखील आगीचा मोठा फटका बसला आहे
उमरी (नांदेड): शहरातील हरीओम कन्फेक्शनरी या होलसेल खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानाला आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत जवळपास १६ लाखांचे खाद्यपदार्थ, फर्निचर व २० हजाराची रोकडची राख झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरातील बालाजी मंदिर परिसरात बालाजी कोरनलेलू यांचे हरी ओम कन्फेक्शनरी नावाने बिस्किट्स आणि कॅन्डी विक्रीचे होलसेल दुकान आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघू लागला. शेजाऱ्यांनी पाहणी केली असता दुकानात आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लागलीच याची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन दलास दिली. दरम्यान, आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकान कवेत घेतले. होलसेल दुकान असल्याने आत बिस्कीट आणि कॅन्डीचा मोठ्या प्रमाणावर माल होता. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यामुळे शेजारील घरांची हानी टळली. आगीत संपूर्ण माल, फर्निचर रोख २० हजार जाळल्याची माहिती आहे.
शॉर्टसर्किटमुळे आग, शेजाऱ्यांना मोठी झळ
दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. दरम्यान, याच दुकानाच्या समोर कापडाचे गोदाम आहे. तसेच आजूबाजूला रहिवासी घरे आहेत. आगीचे लोळ बाहेर पडत असल्याने दुकानासमोर पार्क दुचाकींना आग लागली. मात्र, वेळीच नागरिकांनी पाणी टाकल्याने दुचाकी सुरक्षित राहिल्या. शेजारच्या घरावरील पाण्याच्या टाक्या, घरांचे विजेचे मीटर, वायर आदी साहित्य मात्र जळून खाक झाले. आगीचे माहिती मिळताच शहरातील अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.