मराठा आरक्षणावरून मीच टार्गेट का ? कार्यक्रमात गोंधळानंतर अशोक चव्हाण म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 06:59 PM2023-10-24T18:59:15+5:302023-10-24T19:00:59+5:30
मी आणि माझाच मतदारसंघ टार्गेट का ? असा सवाल आमदार अशोक चव्हाण यांनी केला.
- गोविंद टेकाळे
अर्धापूर ( नांदेड ) : विजयादशमीच्या मुहूर्तावर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बोलत असताना मराठा आंदोलकांनी घोषणा देत गोंधळ घातला. यावेळी पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतले. मात्र, या प्रकारामुळे व्यथित झालेल्या आ. चव्हाण मी आणि माझाच मतदारसंघ टार्गेट का ? असा सवाल केला. तसेच आपण एकाच विचाराचे आहोत, आपल्या पोरांनी याचा विचार करावा. आरक्षण मिळालंच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका असल्याचे चव्हाण यांनी जाहीर केले.
अर्धापूर तालुक्यातील, महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा विजयादशमीच्या मुहूर्तावर २०२३-२४ गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम दि.२४ ऑक्टोबर मंगळवार रोजी भास्करराव खतगावकर, आ.मोहन हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, सभापती संजय देशमुख लहानकर यांनी मनोगत व्यक्त केले.त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे बोलत असताना मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. "एक मराठा, लाख मराठा", साहेब मराठा समाजाच्या सन्मानार्थ राजीनामा द्या अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही माझी प्रामाणिक आणि भूमिका स्पष्ट आहे, लपून छपून नाही, असे म्हणत चव्हाण यांनी मुखेड, लोहा, कंधार सोडून माझा मतदारसंघ आणि मीच टार्गेट का ? असा सवाल केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नुकत्याच झालेल्या आत्महत्या आणि आरक्षणासंदर्भात लोकांच्या भावना लक्षात घेऊन यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही. मुळात मी वाढदिवस साजराच करत नाही.मात्र, दरवर्षी लोक भेटायला येतात. त्यांच्या इच्छेचा मान ठेवावा लागतो. यंदा कोणीही गुच्छ वगैरे घेऊन येऊ… pic.twitter.com/9LJx9Z1oEu
— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 24, 2023
केंद्राने कायदा करून आरक्षण द्यावे
आपल्या पोरांनी विचार करावा. आपण एकाच विचाराचे आहोत, हे मराठा समाजाच्या आपल्या पोरांनी समजून घेतले पाहिजे. आरक्षण देणे हा राज्याचा विषय नसून केंद्राचा विषय आहे. जर महाराष्ट्रातील मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसच्या धरतीवर संसदेत कायदा करावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.
वाढदिवस साजरा करणार नाही
मराठा समाज बांधवांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्या. त्यावेदना भावना दुःख आम्हा सर्वांना आहेत. यामुळे मी यावर्षी वाढदिवस साजरा करणार नाही. कोणीही वाढदिवसाला हार - तुरे, गुच्छ- पुष्प आणू नये, असे आवाहन यावेळी चव्हाण यांनी केले.