फ्लॅटमध्येही पेटवायच्या का चुली; गॅस पुन्हा २५ रुपयांनी महागला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:19 AM2021-09-03T04:19:41+5:302021-09-03T04:19:41+5:30
कधीकाळी ३५० रुपये किंमत असलेला स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आता ९११ रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. नऊ महिन्यांतच तब्बल १९५ ...
कधीकाळी ३५० रुपये किंमत असलेला स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आता ९११ रुपयांना विकत घ्यावा लागत आहे. नऊ महिन्यांतच तब्बल १९५ रुपयांची दरवाढ झाली आहे. परिणामी सामान्य नागरिक या दरवाढीने मेटाकुटीस आला आहे. घराचे बजेट सांभाळताना गृहिणींनाही कसरत करावी लागत आहे.
दर महिन्याला होणारी गॅस सिलिंडरची दरवाढ गरिबांसह मध्यम वर्गीयांनाही परवडणारी नाही. आता फ्लॅटमध्येही चुली पेटवाव्यात की काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. महागाई विरोधात आंदोलन करून सत्तेत आलेल्या सरकारला महागाई रोखता आली नाही.
दोन वर्षांपासून सबसिडीही नाही
nदोन वर्षांपासून मोदी सरकारने गॅस सिलिंडरवरील सबसिडीही बंद केली आहे. त्यामुळे सामान्य नागरिक आणखीच अडचणीत सापडला आहे.
n जवळपास २५० रुपये मिळणारी सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्य नागरिक संतप्त झाला आहे. सबसिडी नाही तर नाही, दरवाढ तरी थांबवा, अशी मागणी होत आहे; पण सरकारने सबसिडीही बंद केली आहे आणि दरवाढ थांबण्याचे नाव घेत नाही.
व्यावसायिक सिलिंडरही ७५ रुपयांनी महाग
व्यावसायिक गॅस सिलिंडरही ७५ रुपयांनी महागला आहे. ११०० रुपयांवरील व्यावसायिक गॅस सिलिंडर १६५० वर पोहोचला होता. त्यात आणखी ७५ ते १०० रुपयांची भर पडली आहे. ही वाढीव रक्कम ग्राहकांच्या खिशातूनच हॉटेल व्यावसायिक वसूल करणार यात शंका नाही.
महिन्याचे गणित कोलमडले
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून देशात मोदी सरकार सत्तेवर आले. मात्र, प्रतिदिन पेट्रोल आणि गॅस सिलिंडरची दरवाढ होत आहे. ती कधी रोखणार, हाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे.
- राजश्री संगनवार, नांदेड