बांध कमर क्यू डरता है, देख प्रभू क्या करता है !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 07:06 PM2020-09-03T19:06:56+5:302020-09-03T19:10:35+5:30
मी माझ्यासाठी नाही, भक्तांसाठी आहे
- शिवराज बिचेवार
नांदेड :राष्ट्रसंत डॉ़ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नांदेडकरांवर अनेक दशके आशीर्वादरुपी छत्र होते़ नांदेडात लाखोंच्या उपस्थित झालेला सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताह असो किंवा गावोगावी आपल्या खणखणीत आवाजातील आशीर्वचनाने त्यांनी अनेकांना भक्तीचा मार्ग दाखविला़ लिंगायत धर्ममान्यता आंदोलनाचा नांदेडातूनच शंखनाद केलेल्या अप्पांनी अखेरचा श्वासही नांदेडातच घेतला़
१५ ते १७ जानेवारी या काळात जुना मोंढा मैदानावर सर्वधर्मीय राज्यस्तरीय अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन केले होते़ दररोज ११ हजार १११ भाविक त्यात परमरहस्य ग्रंथाचे पारायण करीत होते़ त्यावेळी काढलेल्या शोभायात्रेत हत्तीवर स्वार झालेल्या अप्पांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली़ सर्व धर्मातील संत आणि विचारवंतांनीही यामध्ये सहभाग घेतला होता़ मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी दुकानात तर अनेक कुटुंबानी आलेल्या भाविकांच्या ठिकठिकाणी राहण्याची सोय केली़ अशोकराव चव्हाण हे ही त्यावेळी पारायणाला बसले होते़ दिवंगत शंकरराव चव्हाणापासून त्यांचे चव्हाण कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते होते़
आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी धर्मप्रसाराचे कार्य केले़ उपचारासाठी पुणे, मुंबई येथे नेण्याची तयारी सुरु असताना त्यांनी मात्र नांदेडलाच उपचार घेण्याचा आग्रह केला़ अप्पा लिंगैक्य झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करणे आवश्यक असल्याची बाब नमूद केली़ त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगेच प्रशासनाला त्याबाबत आदेश दिले़ देशभक्ती नसानसात भिनलेल्या अप्पांना बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली़ यावेळी लाखो जणांनी साश्रू नयनांनी निरोप दिला़
सोप्या अन् साध्या भाषेत आशीर्वचन
मन अस्वस्थ झाल्यानंतर मी लगेच भक्तीस्थळ गाठायचो़ अप्पांच्या सानिध्यात तासन् तास वेगवेगळ्या विषयावर बोलायचो़ अप्पाही न थकता प्रत्येक विषयावर सखोलपणे चर्चा करीत होते़ प्रचंड विद्वत्ता असलेल्या अप्पांच्या सहवासात गेल्यानंतर आयुष्यातील संकटे किंवा इतर सर्व विषयांचा विसर पडत होता़ त्यांचे नेहमीचे एक वाक्य होते़ बांध कमर क्यू डरता है, देख प्रभू क्या करता है़ हिम्मत धरा, संकटांना घाबरु नका, ईश्वर तुमच्या पाठीशी आहे़ अशा पद्धतीने ते धीर देत होते़ त्यामुळे लाखोंच्या उपस्थितीतील त्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन अत्यंत चोखपणे पार पाडण्यासाठी बळ मिळत होते़ सर्वसामान्यांना सहज समजेल आणि उमजेल अशा सोप्या भाषेतील त्यांचे आशीर्वचन ऐकल्यानंतर मन तृप्त होत होते़ अशी प्रतिक्रिया माजी सभापती किशोर स्वामी यांनी दिली़
आठ कोटी लिंगायतांना एकत्र आणण्याचा संकल्प
परमपूज्य आप्पाजी हे लिंगायत आंदोलनाचे दिव्य नेतृत्व होते़ अनेक भाषेत आणि अनेक राज्यात विभागालेल्या देशातील आठ कोटी लिंगायतांना एकत्र आणण्याचा त्यांचा संकल्प होता़ तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व जीवन पणाला लावू अशा शब्दात बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड़अविनाश भोसीकर यांनी श्रद्धांजली वाहिली़
मी माझ्यासाठी नाही, भक्तांसाठी आहे
कार्यक्रमाची तारीख डायरीत लिहिल्यानंतर अप्पा काही झाले तरी, तो कार्यक्रम चुकवायचे नाही़ बारडला प्रवचनासाठी त्यांनी तारीख दिली होती़ परंतु त्याच्या एक दिवस अगोदरच त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला़ त्यामुळे सर्वांनी त्यांना बारडचा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले़ त्यावर स्पष्टपणे नकार देत मी माझ्यासाठी नाही, भक्तांसाठी आहे़ माझे भक्त माझी वाट पाहत असतील़ तुम्ही फक्त गाडी स्टेजपर्यंत न्या, मला स्टेजवर बसवा अन् पुन्हा गाडीत बसवा एवढेच करा असे सांगितले़ त्यानंतर बारडला हजारो भाविकांसमोर त्यांनी प्रवचन केल्याची आठवणही किशोर स्वामी यांनी सांगितली.