पत्नी आणि मुलाचा विहीरीत फेकून खून; पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 06:36 PM2019-03-04T18:36:09+5:302019-03-04T18:36:42+5:30
पतीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होऊन कृत्याची कबुली दिली़
अधार्पूर (जि़नांदेड) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाला स्वत:च्या हाताने विहीरीत ढकलून दोघांचाही बळी घेतल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील लहान येथे रविवारी रात्री घडली. या प्रकरणातील आरोपी पतीने स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होऊन कृत्याची कबुली दिली़ या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अर्धापूर तालुक्यातील लहान येथे राजेश श्रीमंगले हा आपल्या कुटुंबासह राहत होते़ श्रीमंगले हे अर्धापूर येथील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून काम करायचा. रविवारी रात्री ७ च्या सुमारास राजेश पत्नी अलका (वय २७), मुलगी रूपाली (वय ३) व एक वर्षाचा मुलगा रूपेश यांना घेऊन सासरवाडीकडून आपल्या गावी लहान येथे जाण्यासाठी निघाला. ते रात्री ८ वाजताच्या सुमारास अर्धापूर येथे पोहोचले. येथून लहानकडे जाताना नांदेड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत ते थांबले़ त्यानंतर रोडलगत असलेल्या एका पडीक विहीरीजवळ नेऊन त्याने पत्नी अलका व मुलगा रूपेश या दोघांना विहीरीत ढकलून दिले़ यातच या दोघांचाही मृत्यू झाला
त्यानंतर चिमुकली रूपालीला सोबत घेऊन तो लहान येथील स्वत:च्या घरी आला. तेथे मुलीला सोडून त्यांने अधार्पूर पोलीस ठाणे गाठले. आणि पोलिसांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा व मुलाचा खून केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सावळे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.