कोर्टात प्रकरण असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 06:14 PM2019-06-24T18:14:53+5:302019-06-24T18:16:03+5:30
न्यायालयाचा निर्णय : फारकतीसाठी सुरु आहे न्यायालयात दावा
नांदेड : पती-पत्नीत बिनसल्यानंतर न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरू असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणा करण्याचा अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निकाल नांदेड कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे. येथील डॉ. प्रिया (नाव बदलले) यांचे लग्न मुंबई येथील डॉ. कुंतल पाल यांच्यासोबत २०१० मध्ये झाले होते. लग्नानंतर काही वर्षे हे जोडपे आनंदाने राहिले. त्यांना क्रिशांग हा मुलगाही झाला. परंतु त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होऊ लागले. पत्नी डॉ. प्रिया हिने कौटुंबिक न्यायालयात अॅड. शिवराज पाटील यांच्यामार्फत प्रकरण दाखल केले.
दरम्यानच्या काळात डॉ. कुंतल पाल यांनी पत्नीपासून फारकत मिळावी म्हणून मुंबई येथे प्रकरण दाखल केले. या प्रकरणात होणारा विलंब लक्षात घेता डॉ. प्रिया हिने पतीपासून बाळ व्हावे व तिला बाळ जन्माला यावे अशी इच्छा व गरज दाखविणारा अर्ज न्यायालयात दाखल केला. डॉ. पाल यांनी या अर्जाला विरोध केला. डॉ. प्रिया हिने पोटगीची कार्यवाही केली आहे. क्रिशांग या बाळाला १२ हजार रुपये एवढी पोटगी मंजूर झाली असून दुसरे बाळ जन्माला आल्यास तो सुद्धा पोटगी मागू शकतो. तसेच कायद्यामध्ये पती-पत्नीमध्ये वाद असताना पत्नी ही पतीकडून गर्भधारणा करण्याची मागणी करु शकत नाही, असा युक्तीवाद डॉ. पाल यांच्या वकिलांनी केला. डॉ. प्रिया यांच्यावतीने अॅड. शिवराज पाटील यांनी न्यायालयात १९९२ च्या जीआर नुसार उभयंतांना दोन मुलांपर्यंत जन्माला घालण्याचा अधिकार आहे. घटनेच्या कलम २१ प्रोटेक्शन आॅफ लाईफ अॅन्ड पर्सनल लिबर्टी आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार पती-पत्नीने शारीरिक संबंध न ठेवताही सरोगशी तंत्रज्ञान वापरुन पती-पत्नी बाळाला जन्म देवू शकतात. गर्भधारणेची मागणी करणे हा पत्नीचा अधिकार आहे. या अधिकारापासून तिला कोणीही वंचित ठेवू शकत नाही, असा युक्तीवाद केला.
न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून न्यायालयात प्रकरण सुरु असताना पत्नीला पतीपासून गर्भधारणेचा अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय न्या. स्वाती चव्हाण यांनी दिला. तसेच या प्रक्रियेसाठी नांदेडातील तज्ज्ञ महिला डॉक्टरची नियुक्ती केली. अॅड. शिवराज पाटील यांना अॅड. मंगल पाटील, अॅड. गेठे, अॅड. वंदना पवार, अॅड. माया राजभोज, अॅड. भगवान कदम, सुशिल लाठकर, महेश संगनोर यांनी सहकार्य केले.