रोजगाराच्या कामांना मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:23 AM2019-05-18T00:23:43+5:302019-05-18T00:25:57+5:30
रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आहे़
नांदेड : रोजगार हमी योजनेची कामे मागणी केल्यानंतर तीन दिवसांत मंजूर केले जाणार असल्याने या कामांना गती मिळणार आहे़ सध्या ९४२ कामे सुरू असून १३ हजार ५१२ मजूर काम करत आहेत़ दरम्यान, २८ प्रकारच्या कामांनाही मंजुरी देण्यात आल्याने मजुरांच्या संख्येत वाढत होणार आहे़
जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत ग्रामपंचायती तसेच विविध यंत्रणेकडून कामे करवून घेतली जातात. या कामावर रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. ही कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे बंधन असताना जिल्ह्यात २०१७-१८ पूर्वीची १८ हजार कामे अपूर्ण आहेत. दुष्काळाची छाया गडद होत असताना अनेक गावांतून मजुरांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होत होते़ दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत़ दुष्काळाची स्थिती आणि त्याबाबतच्या उपाययोजनांवर शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत़ दरम्यान, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आॅडिओ ब्रिजच्या माध्यमातून दुष्काळी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधला होता. त्यावेळी अनेकांनी रोजगार हमी योजनेच्या कामांचे प्रस्ताव मार्गी लागत नसल्याची तक्रार केली होती. त्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामांना तीन दिवसांत मंजूर करण्याचे आदेश देण्यात आले़ या निर्णयामुळे जिल्ह्यातील रोजगाराच्या कामांना गती मिळणार आहे़
दरम्यान, २०१२ पर्यंत जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होती़ रोजगार हमी योजनेच्या कामामुळे नांदेड जिल्ह्याची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली होती़ मात्र मागील दोन, तीन वर्षापासून रोजगार हमीचे कामे बंद असल्याने उन्हाळ्यात मजुरांचे मोठ्या प्रमाणावर परप्रांतात स्थलांतर होत आहेत़ गावात हाताला काम मिळत नसल्याने मजुरांनी यापूर्वीच तेलंगणा, आंध्र प्रदेश व मुंबई, पुण्यात स्थलांतर केले आहे़ उर्वरित मजूर रोजगार हमीच्या कामाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यातही ज्यांच्याकडे जॉबकार्ड उपलब्ध आहे, अशांनाच कामे मिळतात़ सध्या २०६ रूपये मजुरीचे दर असून दुष्काळात तेवढाच आधार उपलब्ध असल्याचे मजूर सांगत आहे़
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या कामे व मजुरांची आकडेवारी पुढील प ्रप्रमाणे, किनवट तालुक्यात १६४ कामावर २ हजार ९३ मजूर, भोकर ता ८८ कामावर १ हजार ८२१, अधार्पूर ९१ कामावर १ हजार ३६३,लोहा ११५ कामावर १ हजार १५९, उमरी ७१ कामावर १ हजार ४१ मजूर कामावर आहेत. नव्या आदेशामुळे मजुरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़
अनेक मजूर जॉबकार्डपासून वंचित
- जिल्ह्यात अपूर्ण राहिलेल्या कामामध्ये १ हजार २५३ कामे कृषी विभागाचे आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाचे कामे ५४१, वनीकरण विभागाचे ३८९, रेशीम विभागाचे ४२२ कामे अर्धवट राहिले आहेत.
- जिल्ह्यात अनेक मजुरांकडे जॉबकार्ड उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. ज्या मजुरांकडे जॉब कार्ड आहेत ते अद्ययावत करण्यात आले नाहीत.त्यामुळे मजूर कामापासून वंचित राहत आहेत़
- जिल्ह्यात सध्या रोजगार हमीच्या कामांची कासवगती असली तरी संबंधित विभाग प्रमुखांना कामांना मंजुरी देण्याचे अधिकार देण्याता आल्याने कामांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे़